डिसेंबर अखेरीस नीचांकी तापमानाची नोंद करून हुडहुडी भरवून देणाऱ्या थंडीचा पुन्हा एकदा लपंडाव सुरू झाला असून वातावरणात पसरलेला गारवा ढगाळ हवामानामुळे अंतर्धान पावला आहे. वातावरणातील या बदलामुळे पाच दिवसांपूर्वी सहा अंशापर्यंत उतरलेला नाशिकचा पारा पुन्हा सहा ते अंशांनी वर चढला आहे. ढगाळ हवामानामुळे दिवसभर अक्षरश: उकाडा जाणवू लागला आहे.
उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे चार ते पाच दिवसांपूर्वी थंडीच्या लाटेत सापडलेल्या उत्तर महाराष्ट्राचे तापमान ढगाळ वातावरणाचे मळभ दाटल्याने काहिसे उंचावले आहे. परिणामी, सर्वत्र भरून राहिलेला गारवा गायब झाला. डिसेंबरच्या अखेरीस उत्तर महाराष्ट्रातील तापमानाने आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली होती. सलग दोन दिवस तापमानाची ही पातळी टिकून राहिली. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा वाढू लागला आहे. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत तापमानात साधारणत: सहा ते सात अंशांचा फरक पडला आहे. एरवी, डिसेंबर हा कडाक्याच्या थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. परंतु, यंदा संपूर्ण महिनाभर गायब असलेली थंडी अखेरच्या टप्प्यात दाखल झाली खरी, मात्र, दोन दिवसात ती पुन्हा गायब झाली. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव या भागातील तापमानावर होत असतो. तापमान कमी कमी होत असताना ढगाळ हवामानाने त्यात अवरोध निर्माण केला. तीन ते चार दिवसात काही भागात अधुनमधून ढग दाटत राहिल्याने घसरणाऱ्या तापमानाला ब्रेक लागल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. उत्तरेकडे अनेक भागात सध्या बर्फवृष्टी सुरू असून कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे खरेतर त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर पडणे अपेक्षित होते. परंतु, ढगाळ वातावरणामुळे हा प्रभाव पडू शकला नसल्याचे हवामान शास्त्र विभागाने म्हटले आहे. आकाश निरभ्र झाल्यास पुढील काही दिवसात उत्तर महाराष्ट्र पुन्हा एकदा चांगलाच गारठणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वास्तविक, यंदाच्या हंगामात दिवाळीनंतर लगेचच थंडीचे आगमन झाले होते. त्यामुळे यंदा अधिक काळ गारव्याची अनुभूती मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यातच, डिसेंबरच्या अखेरीस नीचांकी तापमानाची नोंद झाल्यामुळे थंडीचा कडाका जाणवत होता. चार ते पाच वर्षांतील नीचांकी पातळीचा आढावा घेतल्यास ही नोंद प्रामुख्याने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात झाली असल्याचे लक्षात येते. यंदा महिनाभर आधीच ही पातळी गाठली गेल्याने हंगाम संपुष्टात येईपर्यंत म्हणजे किमान दीड ते दोन महिने हिवाळ्याचा आस्वाद घेता येईल, अशी स्थिती होती. परंतु, नवीन वर्षांला प्रारंभ होत असतानाच थंडी अंतर्धान पावली. सध्या तर अशी स्थिती आहे की, दिवसभर उकाडा जाणवत असून रात्रीही पंखा लावल्याशिवाय झोप येत नाही. पाच दिवसांपूर्वी थंडीने गारठलेल्या नाशिककरांची ही स्थिती आहे. थंडीची तीव्रता कमी-अधिक होत असताना तापमानाच्या नोंदींतील तफावत कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी बसविलेले खासगी स्वयंचलीत हवामान केंद्र, कृषी महाविद्यालय, जिल्हा प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या नोंदी, हवामानशास्त्र विभागाच्या नोंदी यात कमालीची तफावत असल्याचे आढळून आले आहे. तापमानातील चढ-उतार व ढगाळ हवामान यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.