जिल्ह्य़ातील पाचही विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळी ११ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात १५.३४ टक्के तर, दुपारी एक वाजेपर्यंत ३१.३७ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
जिल्ह्यात ५३ उमेदवार नशीब अजमावत आहेत. धुळे शहर मतदारसंघातून सर्वाधिक १५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार शिरपूर मतदारसंघात आहेत.
शिंदखेडा आणि धुळे ग्रामीणमधून प्रत्येकी १० तर साक्रीतून ११ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वाच्या भवितव्याचा फैसला करण्यासाठी मतदार राजा सकाळपासूनच घराबाहेर पडल्याचे बघावयास मिळाले. दुपारी एकपर्यंत साक्रीमध्ये ३०.६०, धुळे ग्रामीण ३३.८९, धुळे शहर २१.०३, शिंदखेडा ३०.५२ आणि शिरपूरमध्ये ४०.०७ टक्के मतदान झाले.
धुळे शहर वगळता उर्वरित मतदारसंघांमध्ये मतदारामध्ये अधिक उत्साह दिसून आला. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान करून घेण्यासाठी सकाळपासूनच स्पर्धा सुरू होती.
पाचही मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमध्ये साक्री मतदारसंघात धनजी अहिरे (काँग्रेस), मंजुळा गावित (भाजप), दिलीप नाईक (राष्ट्रवादी), चुडामण पवार (शिवसेना), दीपक भारुडे (मनसे).
शिरपूर – गुलाबराव मालचे (कम्युनिस्ट पार्टी), काशिराम पावरा (काँग्रेस), डॉ. जितेंद्र ठाकूर (भाजप), जयवंत पाडवी (राष्ट्रवादी), रणजितसिंह पावरा (शिवसेना)
शिंदखेडा – राजेंद्रसिंग गिरासे (शिवसेना), संदीप बेडसे (राष्ट्रवादी), जयकुमार रावल (भाजप), श्यामकांत सनेर (काँग्रेस)
धुळे शहर- अनिल गोटे (भाजप), राजवर्धन कदमबांडे (राष्ट्रवादी), खान मोहम्मद साबीर माहेबुल्लाह (काँग्रेस), अ‍ॅड. नितीन चौधरी (मनसे), सुभाष देवरे (शिवसेना)
धुळे ग्रामीण- अजय माळी (मनसे), कुणाल पाटील (काँग्रेस), किरण पाटील (राष्ट्रवादी), प्रा. शरद पाटील (शिवसेना), मनोहर भदाणे (भाजप)