प्रचार हायटेक.. उमेदवार मात्र जुनाटच

लोकसभा निवडणूकीमध्ये सोशल नेटवर्कीग संकेतस्थळांचा प्रभावी वापर निवडणूक काळात मोठय़ा प्रमाणावर झाला.

लोकसभा निवडणूकीमध्ये सोशल नेटवर्कीग संकेतस्थळांचा प्रभावी वापर निवडणूक काळात मोठय़ा प्रमाणावर झाला. विधानसभा निवडणूकीत या प्रचार पद्धतीचा प्रभावी वापर करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोठी ताकद लावली. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्वीटर, अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडविण्यात आला. सोशल नेटवर्कीगचा प्रभाव वाढला असला आणि प्रचारातही त्याचा वापर होत असला तरी प्रत्यक्ष उमेदवारांमध्ये मात्र माहितीच्या या महाजालाचे कमालिचे अज्ञान दिसून येत आहे.  
उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा आढावा घेतला असता अनेकांनी सोशल नेटवर्किंग खात्याची माहिती देताना इमेल पत्त्याचा समावेश केला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरी मतदारांच्या पट्टय़ांमध्ये सोशल नेटवर्किंग प्रचाराची राळ उडाली आहे. ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, मुंब्रा-कळवा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, कल्याण पश्चिम, अंबरनाथ या नऊ शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या १२८ आहे. या उमेदवारांपैकी अध्र्याहून अधिक उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातील सोशल नेटवर्किंग खात्याचा रकाना रिकामा (निरंक) ठेवला आहे. तर काही उमेदवारांनी आपले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर खाते आहे, असे म्हटले आहे. मात्र, त्याची विस्तृत पत्ता  देण्याचे टाळले आहे. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती पाहून त्यांचे संकेतस्थळ शोधणाऱ्या अनेक तरूणांचे भ्रमनिरस होताना दिसतो. निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र भरताना सोशल नेटवर्किंगबद्दलची अनास्था दिसत असली तरी प्रत्यक्ष प्रचार करताना मात्र टेक्नोसॅव्ही कार्यकर्त्यांची मोठी फळी अनेक उमेदवारांनी ऊतरवली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात काही ऊमेदवारांनी त्यासाठी ‘वॉर रूम’ तयार केल्या असून तेथून प्रचार सुरु आहे.
एसएमएस प्रचार घटला..
२००९ च्या प्रचारामध्ये मोबाईलवरून अधिकाधिक ‘एसएमएस’ पाठवण्याचे प्रयत्न झाला होता. त्यामुळे कंपन्यांचा धंदाही तेजीत होता. एकाचवेळी अनेक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हे माध्यम उपयुक्त ठरत होते. मात्र, अ‍ॅण्ड्रॉइडमुळे एसएमएस पाठवण्याचा प्रकार यंदाच्या निवडणूकीमध्ये कमालाची घटला आहे. व्हॉट्सपच्या माध्यमातून प्रचार, टिका टिप्पणी आणि एकमेकांवर कुरघोडी करणारे विनोद प्रसारीत केले जात असताना या प्रकारच्या प्रचारामध्ये उमेदवारांपेक्षा कार्यकर्तेच अधिक आक्रमक बनले असल्याचे दिसून येते. उमेदवारांपेक्षा त्यांचे समर्थक विविध ग्रुपच्या माध्यमातून उमेदवारांच्या प्रचारामध्ये आपले ‘कसब’ पणाला लावत असल्याचे चित्र आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hightake promotions for elections but candidates are still old