आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांबरोबरच विविध क्षेत्रांतील लोकही त्यांच्या आवडीच्या विषयांवर चित्रपट, लघुपट बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरण, गिर्यारोहण, सायन्सविषयक लघुपट-चित्रपट-माहितीपटांची संख्या वाढते आहे. ‘शैलभ्रमर’ ही प्रस्तरारोहण क्षेत्रातील संस्था रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असून, त्यानिमित्त गिर्यारोहण चित्रपट महोत्सवाचे आयोजन रविवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे.
‘शैलभ्रमर’ने आपल्यासोबत दादर सार्वजनिक वाचनालयाचा सहभाग या महोत्सवासाठी घेतला आहे. एव्हरेस्ट मोहिमेवरील लघुपटांबरोबरच ‘पनामा’, ‘धूमकेतू’, ‘मियार व्हॅली’ हे गिर्यारोहणावरील लघुपटही या महोत्सवात दाखविण्यात येतील. विविध गिर्यारोहण संस्था करीत असलेल्या समाजोपयोगी कार्याचे दृकश्राव्य सादरीकरणही या महोत्सवांतर्गत केले जाणार आहे.
धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर पश्चिम येथे हा महोत्सव दुपारी तीन ते सहा या वेळेत होणार असून, सर्वाना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. रौप्य महोत्सवानिमित्त संस्थापक अशोक पवार पाटील यांनी शैलभ्रमरच्या गेल्या २४ वर्षांच्या अनुभवावर आधारित लिहिलेल्या ‘सुळक्याकडून सुळक्यांकडे’ या पुस्तकाचे पुन:प्रकाशन महोत्सवात केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी वैशाली राणे (९७७३६१७६३०), मनोज सातर्डेकर (९८६९१५९०६३) यांच्याशी संपर्क साधावा.