कुटुंबकल्याण कार्यक्रमात देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करून हिंगोली जिल्हय़ाने ११८ टक्के कामासह राज्यात अग्रगण्य स्थान पटकावले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरुणा बनसोडे यांनी ही माहिती दिली.
जिल्हय़ात २४ प्राथमिक, १३२ उपआरोग्य केंद्रे, एक जिल्हा आरोग्य, एक उप, तर तीन ग्रामीण आरोग्य केंद्रे आहेत. आरोग्य विभागाने ६ हजार ४१५ कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हय़ात ७ हजार ५७२ कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे कुटुंबकल्याणचे ११८ टक्के काम पूर्ण होऊन जिल्हय़ास अव्वल स्थान प्राप्त करता आले. रुग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण ९६ टक्के असल्याने अर्भक व मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले. मुलींचा जन्मदरही वाढला आहे. जिल्हय़ातील १९ ग्रामपंचायतींला लाल कार्ड, तर ४१६ हिरवे व १३१ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. सुमारे ११ ग्रामपंचायतींकडे अजून ब्लिचिंग पावडर नसल्याची माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली.