उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरीय प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या मार्गावरून उन्हाळी स्पेशल एक्स्प्रेस गाडय़ा सोडण्यात आल्या असून त्यांच्या सुमारे १०२ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी ५२ फेऱ्यांना ठाणे स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या गाडय़ा कल्याण तसेच दादर स्थानकात थांबणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे ठाणे येथून आरक्षण केलेल्या प्रवाशांना उन्हाळी विशेष गाडय़ा पकडण्यासाठी आता कल्याण तसेच दादर स्थानक गाठावे लागणार असल्याने त्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. याच पाश्र्वभूमीवर लांब पल्ल्याच्या गाडय़ांना ठाणे स्थानकात कायमस्वरूपी थांबा देण्यात यावा, अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.
देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा मोठा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख असून या ठिकाणी रेल्वेचा दळणवळणासाठी सर्वाधिक वापर होतो. रेल्वेच्या एका अहवालानुसार, ठाणे स्थानकातून दररोज साडेसहा लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच ठाणे स्थानकातून महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. असे असतानाही दररोजच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांना तसेच उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या निम्म्या उन्हाळी स्पेशल एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना ठाणे स्थानकात थांबाच देण्यात आलेला नाही. मध्य रेल्वे आणि पुणे मार्गावरून उन्हाळी विशेष गाडय़ा सुरू करण्यात आल्या असून त्यांच्या सुमारे १२८ फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस – आगरा विशेष गाडी (२४ फेऱ्या), तर छत्रपती शिवाजी टर्मिनस – वाराणसी (२४ फेऱ्या), अशा दोन्ही गाडय़ांच्या एकूण ४८ फेऱ्या होणार असून त्यांना ठाणे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ (२६ फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस (२६ फेऱ्या) या गाडय़ांना ठाणे स्थानकात थांबाच देण्यात आलेला नाही, तर तिसरी गाडी पुणे – लखनऊदरम्यान (२६ फेऱ्या) धावणार आहे.
निम्म्याहून अधिक लांब पल्ल्याच्या गाडय़ांना ठाण्यात थांबा नाही
*ठाण्यात थांबा हवा!
ठाण्यातून जाणाऱ्या प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीला ठाणे स्थानकात थांबा असायलाच हवा. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना अवजड सामानासह गाडी पकडण्यासाठी कल्याण किंवा दादर स्थानकात जावे लागते. त्यामुळे त्यांची तारांबळ उडते. याशिवाय लोकल सेवेवर मोठा भार पडतो. गर्दीच्या काळात तर अशा लांबच्या प्रवासाला निघालेले प्रवासी लोक मध्ये चढूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या गाडय़ादेखील चुकतात. आरक्षणे रद्द करावी लागतात. या सर्व प्रकारामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी ठाण्यात थांबा देण्याचा पर्याय मध्य रेल्वे प्रशासनाने निवडला पाहिजे, अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
*या गाडय़ांनाही थांबा द्या..
उन्हाळी विशेषप्रमाणेच नियमित सुरू असलेल्या गाडय़ांनासुद्धा ठाण्यात थांबा असणे गरजेचे आहे. त्यामध्ये मुंबईकडून जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस या गाडय़ांना, तर मुंबईकडे येणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, कुर्ला-हावडा एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल आणि हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस या गाडय़ांना नियमितपणे थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांची आहे.
* करमाळी, नागपूर एक्स्प्रेस ठाण्यात थांबणार..
कोकण आणि नागपूरसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक करमाळी एसी विशेष आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस- नागपूर विशेष या दोन्ही गाडय़ांना मात्र ठाण्यात थांबा देण्यात आला असल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.