प्रतिमा पूजन..भित्तीपत्रकाचे प्रकाशन..मार्गदर्शन..चित्रकला स्पर्धा, अशा विविध कार्यक्रमांव्दारे शहर परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणच्या कार्यक्रमांमधून महात्मा फुले यांचा आदर्श समोर ठेवून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच युवा पिढीला समाजोपयोगी कार्यासाठी उपदेश करण्यात आला.

सीडीओ मेरी हायस्कुल
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कुलमध्ये महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त मुख्याध्यापक आ. का. वाणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सहकार्यवाह दिलीप अहिरे, उपप्रमुख गीता कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शरद शेळके यांनी फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. भित्ती पत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.

मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिर
नाशिकच्या पखालरोड येथील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात महात्मा फुले पुण्यतिथीचा कार्यक्रम प्रा. एन. जे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शिंदे, माधुरी फडके, सुनील शेवाळे उपस्थित होते. महात्मा फुले यांनी शुद्र, महिला, कामगार, शेतकरी, विधवा यांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर झगडून समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे काम केले. विधवांचे केशवपन, बालविवाह या प्रथा मोडित काढण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, असे पाटील यांनी सांगितले. उपशिक्षिका ज्योती महाले यांनी फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. डब्ल्यएनएस आणि प्रथमा संस्थेच्या वतीने स्पेलिंग स्पर्धा व नवनीततर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्याला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील शेवाळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी यावेळी फुले यांच्या जीवनावर विचार मांडले.

मनपा शाळा क्र. ४५ व ६५
पंचवटीतील विडी कामगार वसाहतीमधील महापालिकेच्या शाळा क्र. ६५ मध्ये महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात मुख्याध्यापिका मंगला शिंदे यांनी प्रतिमापूजन केले. सुशीला पवार, संगीता देवरे आदी यावेळी उपस्थित होत्या. शाळा क्र. ४५ मध्ये मुख्याध्यापिका लता गरड यांनी फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना अभिवादन केले. यावेळी नलिनी नवले, कमल दाते आदी उपस्थित होते.

पंचवटी वाचनालय
पंचवटी सार्वजनिक वाचनालयात प्रमुख कार्यवाह नथुजी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. यावेळी दत्तुपंत रौंदळ, अशोक गालफाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुभाष पाटील यांनी फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. हिरालाल परदेशी यांनी आभार मानले. ग्रंथपाल योगिता भामरे यांनी सूत्रसंचालन केले.

सुभाष वाचनालय
नाशिक येथील सुभाष सार्वजनिक वाचनालयात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास पोलीस अकादमीचे माजी सहाय्यक संचालक गिरधर महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी दीन-दलित आणि महिला यांचे खरे उध्दारकर्ते महात्मा फुले यांच्यासारखे क्रांतीकारी समाजसुधारक भारतात होऊन गेल्याचे नमूद केले. शुद्रांना न्याय आणि महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले आयुष्य वेचले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे विश्वस्त रामदास सोनवणे होते. प्रास्ताविक ग्रंथपाल दत्ता पगार यांनी केले. मान्यवरांचा परिचय कार्याध्यक्ष परमानंद पाटील यांनी करून दिला. प्रमुख कार्यवाह मारूती तांबे यांनी आभार मानले.

युवक काँग्रेस ब्रिगेड
नाशिक शहर युवक काँग्रेस ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. ब्रिगेडचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी राऊत यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मंदी असली तरी या क्षेत्रातील मुलानी भौतिक प्रगतीकडे न पाहता खर्चाला कात्री लावण्याचे आवाहन केले. महात्मा फुले यांच्या विचारांची कास धरत आत्महत्या, निराशा यांना दूर सारावे असेही ते म्हणाले.
फुले यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचावे यासाठी मुलांना फुले वाडमय देण्यास ब्रिगेडने सुरूवात केली असल्याचे राऊत यांनी नमूद केले. यावेळी उपाध्यक्ष अमोल निकम, बालाजी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते