रिक्षामध्ये सापडलेल्या वस्तू प्रवाशांना परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकांचा डोंबिवलीत सत्कार करण्यात आला. रिक्षाचालक म्हणजे उर्मटच, अप्रामाणिकच असा एक समज नागरिकांच्या मनात असतो. तो खोडून काढण्यासाठी सामजिक संस्थांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ईगल ब्रिग्रेडचे विश्वनाथ बिवलकर, इनरव्हील क्लबच्या माधवी पटवर्धन, प्रकल्पप्रमुख राजसी मोहिते, रोटरी क्लबचे राहुल गणपुले यांनी एव्हरेस्ट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे, वाहतूक विभागाचे बी. ए. कदम, ए. सूर्यवंशी, रिक्षा संघटनेचे शेखर जोशी, अंकुश गायकवाड, विश्वनाथ बिवलकर उपस्थित होते. दिनेश गुप्ता या रिक्षाचालकाने एका प्रवाशाचे रिक्षात विसरलेले दागीने तसेच ऐवज परत केल्याने त्याचा आदर्श रिक्षावाला म्हणून सन्मान करण्यात आला. अन्य रिक्षाचालकांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येक रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे आपला व्यवसाय केला तर समाज त्याची दखल घेतो, याची जाणीव या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक रिक्षाचालकाला झाली असेल. एक-दोन रिक्षाचालकांमुळे संपूर्ण व्यवस्थेवर टीका करणे योग्य नाही. रिक्षाचालकांनी वाहनतळावर उभे राहून, कारवाई होणार नाही, वाहतूक कोंडीचा कोणाला त्रास होणार नाही या विचाराने व्यवसाय करावा, असे आवाहन डॉ. करंदीकर यांनी केले.