राजर्षी शाहूमहाराजांनी वंचित घटकांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न केले. यातूनच त्यांच्या सामाजिक समतेचा विचार दिसून येतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त लातूर येथील डीपीडीसी सभागृहात सामाजिक न्यायदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, उपजिल्हाधिकारी प्रदीप मरवाळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती कल्याण पाटील, महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी छाया गाडेकर, डॉ. एस. एस. पाटील आदी उपस्थित होते.
बनसोडे म्हणाले, शाहूमहाराजांचा जन्मदिन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्यायदिनानिमित्त शासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येतात. समाजातील वंचित घटकात जनजागृती निर्माण होण्यास यामुळे मदत होत आहे. या योजनेचा संबंधितांनी योग्य उपयोग करून आपला विकास साधावा.
जिल्हा परिषद बांधकाम सभापती कल्याण पाटील यांचेही समयोचित भाषण झाले. सहायक आयुक्त समाजकल्याण एस. आर. दाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, राजर्षी गुणवत्ता शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टर मंजुरीच्या आदेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहूमहाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाहीर अशोक िशदे यांनी शाहूमहाराजांवर पोवाडा सादर केला. या वेळी विद्यार्थी, नागरिक, लाभार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राजेंद्र सास्तुरकर यांनी केले.