शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पुन्हा एकदा आपले नेहमीचे यशस्वी प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. नोंदीवरील गुन्हेगारांना तात्पुरते हद्दपार, कोम्बिंग ऑपरेशन, जनतेमध्ये जात त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी संभाषण या प्रकारांमुळे काही प्रमाणात गुन्हे कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असली तरी दिवाळीच्या सुटय़ांमध्ये अनेक जण बाहेरगावी जात असल्याने चोरटय़ांचे लक्ष कुलूपबंद असलेली घरे ठरत आहेत. पोलिसांची मर्यादित संख्या लक्षात घेता ते अशा प्रत्येक कुलूपबंद घराचे संरक्षण करू शकत नसल्याने नागरिकांनीच त्यासाठी सुरक्षिततेचे उपाय अवलंबिण्याची गरज निर्माण झाली आहे.
याआधीच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यकालात नाशिकमध्ये गुन्हेगारांनी अक्षरश: हैदोस घातला असताना आयुक्त म्हणून सरंगल आले आणि त्यांनी आपल्या बेधडक कार्यवाहीने सर्वसामान्य नाशिककरांची मने जिंकून घेतली. राजकीय गुंडांपुढे नतमस्तक होण्याऐवजी त्यांना त्यांची लायकी दाखवून देणाऱ्या सरंगल यांच्या निडर वृत्तीचे दर्शन नाशिककरांना खास करून महापालिका निवडणुकीच्या वेळी दिसले. ही व्यक्ती खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक म्हणून वावरत असून त्यांना आपण साथ दिली पाहिजे हे ओळखून नाशिककर त्यांच्या पाठीशी उभे राहिले. अंबड, सिडको परिसराला हैराण करून सोडणारी ‘टिप्पर गँग’ नेस्तनाबूत करून त्यांनी नागरिकांमध्ये आश्वासक वातावरणनिर्मिती केली. एरवी आपल्या गुंड शिष्यास पोलिसांनी अटक केल्यावर ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन त्यास सोडविण्याची व्यवस्था करणारे राजकीय पुढारीही अशा प्रसंगी आपले मोबाइल बंद ठेवू लागले. ज्या कोणी पुढाऱ्याने अशा कामासाठी ठाण्यात जाण्याचे धाडस दाखविले, त्यास रिकाम्या हातानेच बाहेर पडावे लागले.
नाशिककर काहीसे निर्धास्त झाले असताना गेल्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या. मागील महिन्यात तर त्यामध्ये कमालीची वाढ झाली. विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानंतर संशयितांचा तपास लागण्याचे प्रकारही कमी झाले. त्यामुळे आयुक्तांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले. कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, वाहन तपासणी हे नेहमीचे उपाय त्यांनी सुरू केले, परंतु गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आयुक्तांनी यापेक्षाही कठोर कारवाई करावी अशी नाशिककरांची अपेक्षा आहे. आयुक्तांच्या नेहमीच्या उपायांमुळे काही दिवस आपली कारवाई बंद करून गुन्हेगार पुन्हा सरसावतात, असे चित्र दिसू लागले आहे. त्यातच आता दिवाळीच्या सुटय़ांमुळे अनेक घरे बंद राहणार असल्याने घरफोडय़ांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज असली तरी बाहेरगावी जाणाऱ्यांनी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनीही जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक झाले आहे. अनेक अपार्टमेंट किंवा सोसायटय़ांमध्ये शेजारी गावाला की गावात गेले हेच माहीत नसते. कुलूपबंद घरातून काही संशयास्पद आवाज येत असल्यास त्वरित त्याविषयी पोलिसांना कळविणे गरजेचे आहे. सुटींमध्ये काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनीही शेजाऱ्यांना तसेच अपार्टमेंटमधील इतरांना तशी कल्पना द्यावयास हवी. आपल्या इमारतीत, कॉलनीत कोणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्वरित त्यास विचारणा होणे आवश्यक आहे. हे सर्व काही होत नसल्याने दिवसाढवळ्याही बंद घरातून चोरी होते. चोरी झाल्याचे शेजाऱ्यांनाही दुसऱ्या दिवशी कळते. हे सर्व थांबविण्यासाठी पोलिसांवर अवलंबून न राहता प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक दक्षता ठेवल्यास सुटय़ांमधील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविता येऊ शकेल. नागरिकांकडून सहकार्य मिळावे हीच अपेक्षा आहे.