रुग्णालयाच्या सफाई कामाची निविदा न काढताच एकाच कंत्राटदाराला नियमबाहय़ पद्धतीने काम दिले जात आहे. याविरोधात शिवसेनेचे समीर बागवान यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केल्याने नवी मुंबई पालिकेचे रुग्णालयामधील साफसफाईचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे समीर बागवान यांनी नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये साफसफाईबाबत ठेकेदारांशी हातमिळवणी झाल्याचा आरोप केला आहे. वाशी, कोपरखरणे, तुभ्रे, ऐरोली, नेरुळ येथील पालिका रुग्णालयांतील यांत्रिकी सफाईकाम बीव्हीजी या कंपनीला दिले जात आहे. या कंपनीला २००६ सालापासून या साफसफाईच्या कामासाठी ठेका देण्यात आला आहे. जून २०११ मध्ये या कंत्राटाची मुदत संपल्याने अवघ्या दोनच निविदा प्राप्त झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ नियमबाह्य़ असल्याचा आरोप बागवान यांनी केला आहे. तर पुन्हा २७ ऑगस्ट २०१५ रोजी आयुक्तांनी झालेल्या बैठकीत सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. मे. बी.व्ही.जी. इंडिया या कंपनीला देण्यात येणारी मुदतवाढ ही कोणत्या नियमाला अनुसरून आहे, असा सवाल बागवान यांनी उपस्थित केला आहे.पुरेशा निविदा आल्या नाहीत, हे कारण दाखवून एक ते चार कोटी रुपयांचे कंत्राट दिले जात आहे. याबाबतची तक्रार शिवसेनेचे समीर बागवान यांनी थेट मुख्यंमत्र्यांकडे केली आहे. वाशी रुग्णालयात तीन वर्षांचे कंत्राट दिल्यावर कंत्राटाची मुदत संपण्यास तीन महिन्यांचा अवधी बाकी असताना निविदा प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असते, परंतु तसे न करता त्याच कंत्राटदाराला मुदतवाढ देऊन कायम ठेवण्यात आले आहे. गत दहा वष्रे एकाच कंत्राटदाराला सतत मुदतवाढ दिली जात आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांना अधिकार असलेल्या निधीमधून या कंत्राटदरावर मेहेरनजर केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या साफसफाईच्या ठेक्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेत्याकडे बागवान यांनी केली आहे.