ठाण्यात झाले चहाचेही वांधे..
स्थानिक संस्था करास विरोध करत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंद आंदोलनास ठाण्यात उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्यांना वेठीस धरायचे नाही, अशी संयमी भूमिका घेणाऱ्या ठाण्यातील व्यापाऱ्यांनी बुधवारी शहरातील घाऊक आणि किरकोळ दुकाने कडकडीत बंद ठेवली. व्यापाऱ्यांच्या या बंद आंदोलनास ठाणे, कळवा, मुंब्रा भागांतील हॉटेल मालकांनीही पाठिंबा दिला. या भागांतील ७८८ लहान-मोठी उपाहारगृहे बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांचे हाल झाले. विशेष म्हणजे, एलबीटीमुळे तापलेल्या वातावरणात शहरातील लहान-मोठय़ा चहाच्या टपऱ्या आणि वडापावची दुकानेही बंद होती. त्यामुळे ठाण्यातील चाकरमान्यांचे बुधवारी चहाचे वांधे झाले.   
एलबीटीविरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी ठाणे शहरातील व्यापाऱ्यांनी अगदी काल-परवापर्यंत यासंबंधी संयमाची भूमीका घेत दुकाने सुरू ठेवली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर येथील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत बंदची हाक दिली. या बंदचे परिणाम सकाळपासून जाणवू लागले. शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद असल्याने रस्त्यावरील गर्दी कमी जाणवत होती. ठाणे तसेच कळवा, मुंब्रा परिसरातील घाऊक तसेच किरकोळ असे एक लाखापेक्षा अधिक व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा ठाणे व्यापार उद्योग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान या बंदची कल्पना असलेल्या ठाणेकरांनी आदल्या दिवशीच आवश्यक गोष्टींची भरपूर खरेदी करून ठेवली होती. तसेच या बंदमध्ये हॉटेल्सही सहभागी झाल्याने कामानिमित्त इतरत्र जावे लागणाऱ्या चाकरमान्यांनी डबे घेऊनच घरातून बाहेर पडणे पसंत केले. ठाण्यातील पाचपाखाडी, गोखले रोड, राममारुती रोड, स्टेशन परिसर, महागिरी मार्केट यांसारखे अनेक परिसर कायम गर्दीने व्यापलेले असतात. मंगळवारी या ठिकाणची सर्व दुकाने बंद असल्याने या भागांमध्येही शुकशुकाट पाहावयास मिळाला. तसेच एरवीच्या तुलनेत वाहतूक कोंडीचे प्रमाणही कमी होते. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या दबावानंतरही काही भागांमधील लहान दुकाने मात्र सुरूच होती. दुपारनंतर पानटपऱ्या तसेच हातगाडय़ांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनीही आपले व्यवसाय सुरू केले. सायंकाळी शहराच्या सर्व भागांमधील चायनीजच्या गाडय़ाही सुरू होत्या. त्यामुळे रात्री हॉटेलचा रस्ता धरणाऱ्यांनी या चायनीजच्या टपऱ्यांवर आपली भूक भागवली.

क्षणचित्रे
*     एलबीटीविरोधातील आंदोलनात हॉटेल मालकांनी उडी घेतल्याने         उपाहारगृहांमध्ये ताव मारणाऱ्यांची गैरसोय झाली. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर     ताडगोळे विकणाऱ्यांच्या स्टॉलवर त्यामुळे मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.

*     शहरातील प्रमुख भागांमधील सर्व उपाहारगृहे बंद असली तरी गडकरी         रंगायतनमधील उपाहारगृह मात्र सकाळपासून सुरू होते. याची चाहूल         लागताच अनेक चाकरमान्यांनी आपला मोर्चा नाटय़गृहाच्या दिशेने         वळविला. त्यामुळे एरवी नाटकांसाठी जेवढी गर्दी दिसून येत नाही, त्याहून         अधिक गर्दी या परिसरात नजरेस पडत होती. गडकरीचे उपाहारगृह तर         सकाळपासूनच हाउसफु्ल्ल झाले होते.

*    शाहू मार्केट, गोखले रोड, पाचपाखाडी, तलावपाळी भागांतील लहान         खानावळींचा भाव बुधवारी चांगलाच वधारला होता. हॉटेल मालकांच्या         आंदोलनात खानावळी चालकांनीही सहभागी व्हावे, असा आंदोलकांचा         प्रयत्न होता. मात्र, हॉटेलचे दरवाजे बंद असल्याचे पाहून खानावळी         चालकांनी व्यवसाय बंद ठेवण्यास हरकत घेतली. त्यामुळे दुपारी या         ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते.

*    एलबीटीचा आणि वडापाव विक्रेत्यांचा तसा कोणताही संबंध येत नाही.         एलबीटीमधून कांदा-बटाटा, मैदा या पदार्थाना वगळण्यात आले आहे.         असे असताना शहरातील अनेक भागांमधील वडापाव विक्रेत्यांनी आपल्या     टपऱ्या बंद ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. एलबीटीसंबंधी निर्माण         झालेल्या गैरसमजातून आपल्या धंद्यावरही परिणाम होईल, अशी भीती         वडापाव विक्रेत्यांमधून व्यक्त होत होती. त्यामधूनच या टपऱ्या बंद         ठेवण्यात आल्या होत्या. चहाच्या लहान टपऱ्याही बंद असल्याचे चित्र         दिसून आले.

*    या आंदोलनात बुधवारी शहरातील प्रमुख भागांमधील पान             टपरीधारकही सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले. व्यापाऱ्यांचा आग्रह         कसा मोडायचा असा प्रश्न पडल्याने पानटपऱ्या बंद ठेवण्यात आल्याचे         अनेक विक्रेत्यांनी सांगितले. काही विक्रेत्यांनी टपऱ्या बंद ठेवल्या मात्र         त्यालगत सिगारेट, पानाची विक्री उभ्यानेच सुरू ठेवल्याचे चित्र होते.