‘असतील शिते तर जमतील भुते’ किंवा सैन्य पोटावर चालतं, म्हणतात ते काही खोटं नाही. निवडणुका म्हणजे जणू काही युद्धच. कार्यकर्त्यांच्या खाण्याची आणि काही जणांच्या पिण्याचीही व्यवस्था केल्याशिवाय आपला जोर आहे, हे दाखविणारी गर्दी जमविता येत नाही, हे वास्तव जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवारांना माहिती असते. पुन्हा आता पक्षनिष्ठा वगैरे डोक्यात ठेवून निवडणुका आल्या की ‘घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या’ भाजणारी पिढी आता दुर्मीळ होऊ लागली आहे. अशा पक्षनिष्ठ लोकांची एकाच कंपनीत वर्षांनुवर्षे नोकरी करणाऱ्यांसारखी फारशी ग्रोथ होत नाही, हे नव्या पिढीला चांगलंच ठाऊक झालंय. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा उमेदवाराची पत, पैसा आणि प्रतिष्ठा जोखून निवडणूक काळात त्याचे सशुल्क कार्यकर्ते म्हणवून घेताना जास्तीत जास्त चांगले पॅकेज मिळविण्याचा ते प्रयत्नात असतात. पूर्वी कटिंग चहा आणि नाक्यावर मिळणारा वडापाव या खुराकावर कार्यकर्ते पडेल ती कामे करायचे. त्यानंतर कार्यकर्त्यांना चायनीजची चटक लागली. पुढे निवडणुकीतील अर्थकारण जसजसे वाढत गेले तसतसे कार्यकर्त्यांच्या मागण्याही वाढत जाऊ लागल्या. ‘पुढे पाच वर्षे मग ते कुठे आपल्याला ओळख देतात’ असा हिशेबी युक्तिवाद करून कार्यकर्ते कोंडीत सापडलेल्या उमेदवाराचे खिसे कापत असतात. कार्यकर्त्यांच्या या खाबुगिरीमुळे निवडणूक खर्चाचे गणितही हल्ली कोलमडू लागले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर निवडणूक आयोगाने श्ॉडो रजिस्ट्ररमध्ये मांडलेल्या उमेदवारांच्या खर्चात कार्यकर्त्यांनी खाल्लेल्या पदार्थाचे दर लिहून राजकीय पक्षांना घाम फोडला होता. त्यात अगदी वडापावपासून मटण मसालापर्यंत विविध जिन्नसांचे दर दिले होते. त्यावरून बरीच खडाखडीही झाली. आक्षेप नोंदविले गेले. कारण बाहेरून मागविलेल्या पदार्थाचा खर्च हाताबाहेर गेला होता. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांच्या खानपान व्यवस्थेसाठी नामी शक्कल लढवली. त्यांनी सामुदायिक उदरभरणासाठी प्रचार कार्यालयात चक्क लंगरच सुरू केले असून त्यासाठी खास कॅटर्स नेमण्यात आले आहेत. ठाण्यात सध्या अशाच प्रकारे एका भाईने कार्यकर्त्यांसाठी उघडलेला लंगर चर्चेचा विषय आहे. भाईचा लंगर म्हणूनच तो ओळखला जातो. केवळ ठाणेच नव्हे तर डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथेही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.
    
रोजचीच कोजागरी  
हाती असलेल्या अतिशय थोडय़ा दिवसांत सर्व मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांची सध्या दमछाक होत आहे. दिवसा संपर्कासाठी भ्रमंती आणि रात्री निवासस्थानी अथवा प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत खलबते असे रुटीन असलेल्या अनेक उमेदवारांचा दिवस सध्या सकाळी लवकर सुरू होऊन  उत्तररात्री उशिरा संपतो. रात्री दोन, तीन तर काहीजण तर चक्क सकाळी सहा वाजता झोपून पुन्हा आठ वाजता उठतात. दसऱ्यानंतर येणाऱ्या कोजागरीला जागरण करून चंद्राचे प्रतिबिंब पडलेले दूध पिण्याची प्रथा आहे. राजकीय मंडळींची तर सध्या १५ ऑक्टोबपर्यंत रोजचीच कोजागरी आहे. ‘रात्र वैऱ्याची असते म्हणतात. त्यामुळे मतदान होईपर्यंत ती जागूनच काढलेली बरी’, असे उमेदवार गमतीने म्हणत असले तरी सध्या त्यांची झोप उडाल्याचेच दिसून येते. कारण जरा कुठे डोळा लागला की यंदा मतदार आपली दिवाळी करणार की दिवाळे या प्रश्नाने त्यांना दचकून जाग येते.