चौकशी समितीकडून छाननी
हजरत निजामोद्दिन दिल्ली एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसचे १४ डबे गाडीचे इंजिन पुढे गेल्यानंतर कसे घसरले ही बाब चौकशी समितीने गांभिर्याने घेतली आहे. त्यामुळे भुसावळ विभागातील रेल्वे मार्ग व्यवस्थापन विभागातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेप्रकरणी ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या गाडीशी संपर्क आला अशा सर्वाशी संपर्क साधून चार आठवडय़ात प्राथमिक अहवाल तर सहा महिन्यात सविस्तर अहवाल चौकशी समिती सादर करणार आहे.
मंगला एक्स्प्रेसला शुक्रवारी झालेल्या अपघातात तीन ठार तर २६ प्रवासी जखमी झाले. तीस तासाच्या प्रयत्नानंतर ठप्प झालेली नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. अपघाताचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेची रेल्वे सुरक्षा समितीचे आयुक्त चेतन बक्षी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी बक्षी यांनी अनेकांची चौकशी करून माहिती संकलीत केली. अपघातामागे रेल्वे मार्गाच्या देखभालीतील त्रुटी, दोन रुळांमधील अंतर तपासणाऱ्या यंत्रणेची ढिलाई अथवा जुन्या झालेल्या काही रेल्वे रुळांना तडा जाणे, त्यातील अंतर वाढणे, तुटणे अशी काही कारणे आहेत काय, यावर साकल्याने चौकशी केली जात आहे. पूर्वसूचना देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही काय, याची छाननी समिती करत आहे. ‘शॉर्ट सर्किट’ची शक्यता व्यक्त केली जात असली तरी चौकशीत त्यास फारसे महत्व दिलेले नाही. अपघातात सुदैवाने जिवितहानीचे प्रमाण कमी राहिले. परंतु, १४ बोग्यांचे कोटय़वधी रुपयांचे झालेले नुकसान हा देखील कळीचा मुद्दा ठरला आहे. हा प्रकार चौकशी अधिकाऱ्यांनी गांभिर्याने घेतला आहे. मंगलाचे इंजिन रेल्वे रुळावरून पुढे गेल्यानंतर त्यामागील डबे कसे घसरले ही गंभीर बाब आहे. त्यासाठी भुसावळ विभागातील रेल्वे मार्ग देखभाल विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. रेल्वे मार्ग व्यवस्थापनातील त्रुटी अपघातास कारणीभूत ठरल्याचा अंदाज याआधीच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.