केंद्र शासनाची मलनिस्सारण भूमिगत गटार योजना या शहरासाठी अक्षरश: डोकेदुखी ठरली आहे. दिवाळीनंतर मुख्य मार्गावरील खोदकामाला सुरुवात झाली असून अतिशय कमी व्यासाचे पाईप टाकण्यात येत असल्याने पाणी जाणार कुठून आणि कसे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
 पंचशताब्दीच्या कामाला तातडीने सुरुवात करायची असल्याने दिवाळी संपताच मलनिस्सारण भूमिगत गटार योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला कंत्राटदाराने अध्रे शहर फोडल्यानंतर आता पठाणपुरा, गांधी चौक, आंबेडकर चौक, बिनगा वॉर्ड, कस्तुरबा चौक या मुख्य मार्गावरील भागात कामाला सुरुवात झालेली आहे. पठाणपुरा ते कात्यायनी रुग्णालय इथपर्यंत मुख्य मार्ग फोडल्यानंतर त्यात अतिशय कमी व्यासाचे पाईप टाकण्यात आले. तोच प्रकार डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ व सराफा लाईनमध्ये झालेला आहे. ज्या पाईप लाईनमधून एका इमारतीचे पाणी जाणे शक्य नाही तो पाईप संपूर्ण शहराचे पाणी जाण्यासाठी मुख्य मार्गावर टाकण्यात येत आहे. अतिशय कमी व्यासाचा हा पाईप असून महापौर, आयुक्त व उपायुक्त हा सर्व प्रकार  उघडय़ा डोळ्यांनी बघत आहेत. सर्वसामान्यांना पडलेला हा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला नसेल काय. असेही बोलले जात आहे.
मुख्य मार्ग फोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची लाईन ठिकठिकाणी फुटलेली आहे. त्याचे संपूर्ण पाणी रस्त्यावर आलेले आहे. त्याचाही नाहक त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने २००५ मध्ये या शहरासाठी ७० कोटीची भूमिगत गटार योजना मंजूर केली. त्यानुसार शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केले. यानंतर २००७-०८ मध्ये डॉ. सुरेश महाकुलकर नगराध्यक्ष असतांना याला मंजुरी मिळाली. अवघ्या दोन वर्षांत २०१० मध्ये ही योजना पूर्ण करून द्यायची होती. तत्कालीन मुख्याधिकारी किशोर गांधी यांनी निविदा प्रकाशित करून हैदराबाद येथील शिवा स्वाती कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम दिले. प्रत्यक्षात दिड वर्षांपूर्वी २००९ च्या डिसेंबरमध्ये या कामाला सुरुवात झाली. शहरातील १८६ किलोमीटरचे रस्ते फोडून भूमिगत गटारांची पाईप लाईन टाकायचे हे काम होते. संबंधित कंत्राटदार कंपनीने पेटी कॉन्ट्रॅक्टमध्ये पालिकेतील कंत्राटदाराच्या चौकडीला काम दिले आहे. त्यामुळेही या कामाला दिरंगाई होत आहे. पाईप लाईन फुटल्याने बहुतांश प्रभागातील पाणी पुरवठा खंडीत झाला आहे, तर काही प्रभागात अतिशय गढूळ पाणी येत आहे. त्यावरही पालिकेकडे काही उपाययोजना नाही.
यासंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंत्याला विचारणा केली असता मंजूर आराखडय़ानुसारच काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या कामामुळे शहराची पुरती वाट लागलेली आहे. उत्कृष्ट दर्जाच्या पाईपची अट असतांनाही यात अतिशय निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. याचा परिणाम पाईप लाईन टाकलेल्या रस्त्याहून ट्रक किंवा जडवाहन गेले की बहुतांश ठिकाणी पाईप लाईन फुटली, तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यात दोन ते तीन फुट खड्डा पडला. केवळ एकाच रस्त्यांवर नाही, तर शहरातील सर्व प्रभागातील रस्त्यांची हीच अवस्था आहे. मुख्य मार्गही पूर्णपणे फुटलेला आहे. या गटारांमुळे अख्ये रस्ते खोदून ठेवल्याने संपूर्ण शहर खड्डय़ात गेले आहे. त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. त्याचा परिणाम शहरातील चार लाख लोकांना रस्त्याने जाणे-येणे कठीण झाले आहे. आता शहरातील लोकांना खरोखरच त्रास असह्य़ झाल्यानंतर सर्वानी ओरड सुरू केली आहे.
महापालिकेच्या चुकीमुळे लोकांना केवळ त्रासच नाही तर अख्खे शहर खड्डय़ात गेले असतांनाही लोकप्रतिनिधी चुप्पी साधून बसले आहेत. एरवी पालिकेची सर्वसाधारण सभा, विधानसभेत पोटतिडकीने ओरडणारे लोकप्रतिनिधी मूग गिळून चुप बसल्याने सर्वसामान्य जनतेने पुढाकार घ्यावा, अशी ओरड होत आहे.