बारावीच्या परीक्षेच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांची सुधारणा घडवून आणत यंदा अमरावती विभागाने ९१.८५ अशी टक्केवारी गाठली आहे. निकालाच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभागाला दुसरे स्थान मिळाले आहे.
या विभागातून १ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ९९ हजार २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात यंदाही मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. २०११ मध्ये ‘कॉपीमुक्त’ मोहिमेच्या धडाक्यात अमरावती विभागाचा निकालातील वरचढीचा फुगा फुटला होता. त्यावर्षी राज्यात सर्वात कमी म्हणजे ४०.८० टक्के निकाल होता. २०१२ मध्ये १४ टक्क्यांची वाढ होऊन निकाल ६२.८७ टक्क्यांपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षी निकाल ८२.१९ टक्क्यांपर्यंत वाढला. यंदा त्यात अजून सुधारणा झाली. अमरावती विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा ४७६ केंद्रांवरून घेण्यात आली होती. विज्ञान शाखेचा निकाल ९५.२४ टक्के, कला शाखेतून गेल्या वर्षी ७४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा या शाखेतील ८९.६६ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळू शकले. वाणिज्य शाखेतून ९३.९७ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले. एम.सी.व्ही.सी.चा निकाल यंदा ८६.८३ टक्के आहे. अमरावती विभागात निकालाच्या टक्केवारीत अकोला जिल्ह्य़ाने अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्य़ाचा निकाल ९३.३६ टक्के, बुलढाणा ९२.७१, वाशीम ९२.५२, अमरावती ९०.७३ आणि यवतमाळ जिल्ह्य़ाचा निकाल ९०.८८ टक्के लागला आहे.
अमरावती विभागात उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी यंदाही बाजी मारली असून ९४.२८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७५ टक्के आहे. विभागात ७ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, तर २ हजार ६१० जण काठावर पास झाले आहेत. यंदाही उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. यानंतर पाच दिवसात शुल्क भरून संबंधित विद्यार्थ्यांना मंडळाकडे अर्ज करावा लागेल. छायाप्रत संबंधित शिक्षक किंवा मुख्याध्यापकांना दाखवल्यास विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले. अमरावती विभागातील ११७६ कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. सुमारे ७० परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण करण्यात आले. ४७६ बैठी पथके आणि ३२ भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. अमरावती विभागात परीक्षेदरम्यान तोतयेगिरीचा एकही प्रकार आढळून आला नाही. कॉपीची मात्र ६९ प्रकरणे निदर्शनास आली.