महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शनिवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला प्रारंभ होत आहे. चार दिवसांवर परीक्षा आलेली असताना अजूनही शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी मंडळाकडे धाव घेतली आहे.
दरवर्षी शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी किंवा दहावीच्या परीक्षेच्या आधी कुठल्या तरी कारणावरून ऐन परीक्षेच्या काळात गोंधळ होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते. कधी प्रवेशपत्रे मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांची आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांचा क्रमांक राहत नाही, अशा तक्रारी दरवर्षी बघायला मिळतात. त्यामुळे मंडळाने त्यात सुधारणा करणे गरजेचे असताना कुठलीही काळजी घेतली जात नाही.
बारावीची परीक्षा चार दिवसांवर आलेली असताना ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत. शिवाय अनेक प्रवेशपत्रांमध्ये नावाच्या चुका असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी प्रथम शाळांकडे धाव घेतली असून शाळा त्यांना मंडळात पाठवत आहे. एकीकडे बारावीच्या अभ्यासाची काळजी आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांसाठी मंडळाकडे माराव्या लागत असलेल्या चकरा बघता अनेक पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. शाळांमधून प्रवेशपत्रे दुरुस्त करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शिक्षण मंडळामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सचिव आणि अध्यक्षांची पदे रिक्त आहेत. अमरावतीचे अध्यक्ष संजय गणोरकर यांच्या नागपूर शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून तर शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे प्रभारी सचिव म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे मंडळात दोन्ही प्रमुख पदावर अधिकारी नाहीत. गणोरकर हे जास्त वेळ अमरावतीमध्ये असतात तर पारधी शिक्षण उपसंचालक कार्यालयात असतात. त्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवसात कुठलाही निर्णय घेताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. दरवर्षी कॉपीमुक्त अभियानांतर्गत मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, यावेळी असा कुठलाही कार्यक्रम राबवण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. दहावी आणि बारावीसारख्या महत्त्वाच्या परीक्षा असताना शिक्षण विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे शिक्षण वर्तुळात बोलले जात आहे.

परीक्षांची तयारी पूर्ण -चव्हाण
या संदर्भात शिक्षण मंडळाचे सहसचिव राम चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सर्व शाळेत प्रवेशपत्रे मिळाली असून अजूनपर्यंत मंडळाकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. परीक्षेच्या एक महिना आधी सर्व शाळांमध्ये प्रवेशपत्रे पाठवण्यात आली असून त्याचे वाटप करण्यात आलेले नाही. दहावीची प्रवेशपत्रे सुद्धा पाठवण्यात आली असून त्याचे वाटप शाळांमधून केले जात आहे. ज्या विद्याथ्यार्ंच्या प्रवेशपत्रांमध्ये नावाची दुरुस्ती असेल ती ताबडतोब करून विद्याथ्यार्ंना लागेचच प्रवेशपत्र दिले जात आहे. बारावीची परीक्षेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत. प्रवेशपत्रे मिळाली नसल्याच्या तक्रारी असतील तर त्यांनी मंडळाकडे किंवा मंडळाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.