‘लक्ष्मीदर्शना’चे ‘बूमरँग’

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदार संघांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचा गवगवा होत असला तरी ‘लक्ष्मी’ दर्शनाचा मुद्दाही अधिक चर्चेत राहिला.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदार संघांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचा गवगवा होत असला तरी ‘लक्ष्मी’ दर्शनाचा मुद्दाही अधिक चर्चेत राहिला. लक्ष्मीदर्शन झाल्याशिवाय मतदानाला बाहेर पडावयाचे नाही, ही जणू काही आता मतदारांना सवयच लागून गेल्याचे या निवडणुकीत प्रामुख्याने दिसून आले. दिवसभर संथपणे सुरू असलेल्या मतदानामुळे केंद्रांवरील मतदान कर्मचारी व अधिकारीही आळसावलेले असताना शेवटच्या एक तासात अशी काय जादू झाली की बहुतेक मतदान केंद्रांवर अक्षरश: झुंबड उडाल्याचे दिसून आले. झोपडपट्टय़ांसह इतर भागातील मतदान आपल्याकडे खेचण्यासाठी राजकारण्यांनी लक्ष्मीदर्शन घडविण्याचा पाडलेला प्रघातच आता त्यांच्यावर उलटला आहे. काहीतरी हातात पडल्याशिवाय मतदानाला बाहेर पडावयाचे नाही, अशी भूमिका बहुतेक ठिकाणी मतदारांनी घेतल्याचे दिसून आले. या भूमिकेमुळे उमेदवार अक्षरश: रडविले झाल्याचे पाहावयास मिळाले.
या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराकडून कुठल्या वसाहतीत, कितीचा धनलाभ झाला, याची कार्यकर्त्यांप्रमाणेच मतदारांमध्येही चर्चा रंगली. लोकशाहीला लागलेल्या या रोगाने केवळ शहरी भागालाच नव्हे तर, ग्रामीण भागालाही ग्रासले असल्याचे यावेळी दिसून आले. नाशिक शहरातील जुने नाशिक, सिडको, सातपूर, नाशिकरोड व पंचवटीचा काही भाग अशा सर्वच ठिकाणी दिवसभर अत्यंत तुरळक संख्येने मतदार बाहेर पडत होते. त्यामुळे सर्वकाही शांततेत सुरू होते. दुपापर्यंतची मतदानाची परिस्थिती पाहता मतदान पन्नाशीही गाठेल की नाही, याबाबतच साशंकता वाटत होती. पाचवाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत अनेक झोपडपट्टय़ांमध्ये मतदारांना बाहेर काढण्यासाठी उमेदवारांच्या हस्तकांमार्फत वाटाघाटींना सुरूवात झाली होती. या वाटाघाटी ज्याठिकाणी लगेच यशस्वी झाल्या, त्या ठिकाणी मतदानासाठी मतदार त्वरीत बाहेर पडू लागले. परंतु काही ठिकाणी वाटाघाटी बिनसल्या. घडय़ाळाचा काटा जसजसा पुढे सरकू लागला, त्याप्रमाणे उमेदवार आणि अशा भागातील मतदार दोघांची धाकधूक वाढू लागली. बी. डी. भालेकर हायस्कुल या मतदान केंद्राजवळील वस्तीत काही जणांनी जितके मिळतात तितके पदरात पाडून घेण्याची भूमिका घेत मतदानास जाण्याची तयारीही केली. त्यातच कोणीतरी अमूक वसाहतीत अमूक उमेदवाराने आपल्या वसाहतीपेक्षा शंभर रूपये अधिक वाटल्याचा निरोप आणला. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडणारी पावले परत जागीच थबकली. अखेर इतर वस्तीप्रमाणेच त्यांचेही समाधान करण्यात आल्यानंतर मग मतदानासाठी सर्वच बाहेर पडले. एकाचवेळी अचानक इतक्या मोठय़ा संख्येने मतदार आल्याचे पाहून पोलीस आणि केंद्रावरील कर्मचारीही चक्रावले. सहा वाजताच पोलिसांनी शाळेचे प्रवेशव्दार बंद केले. तरीही अनेक जण आपणास मतदानासाठी सोडण्याचा आग्रह धरत होते.
ही अशी परिस्थिती शहरातील अनेक मतदान केंद्रांवर दिसून आली. उमेदवाराने आपले समाधान केल्याशिवाय मतदानासाठी बाहेर पडावयाचे नाही, ही काही मतदारांची भूमिका आणि दीनवाणा चेहरा करून त्यांची विनवणी करणारे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते बघितल्यावर राजकारण्यांवर ‘बूमरँग’ उलटल्याचे जाणवत होते.
केवळ शहरी भागातच लक्ष्मीदर्शनाचा प्रयोग झाला असे नव्हे तर, ग्रामीण भागातही आता हा प्रयोग राबविण्यात येऊ लागला आहे. इगतपुरी, येवला, नांदगाव या मतदारसंघांमध्ये पैसे वाटण्याच्या तक्रारी उमेदवारांच्या समर्थकांकडून एकमेकांविरूध्द करण्यात आल्या. ग्रामीण भागातही दुपारनंतरच मतदानाला वेग येण्याचे महत्वाचे कारण लक्ष्मीदर्शन असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
मालेगाव, देवळा, कळवण या तालुक्यांमध्ये तर काही उमेदवारांच्या समर्थकांनी थेट लक्ष्मीदर्शन घडविण्याऐवजी दिवाळी जवळ आल्याने दिवाळीतील बाजारच घरी पाठविण्याची व्यवस्था केली. काही जणांच्या घरांना रंगरंगोटी करण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. नाशिकप्रमाणेच नंदुरबार, धुळे, जळगाव सर्वत्र बहुसंख्य प्रमाणात मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार घडले. त्यातही काही मतदारसंघांमध्ये सर्वच प्रमुख उमेदवार या प्रकारात सहभागी असल्याने कोणी कोणाविरूध्द तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व कसे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असल्यासारखे. जळगाव जिल्ह्यातही काही मतदारांच्या अवास्तव मागण्यांमुळे उमेदवार रडकुंडीस आल्याचे दिसून आले. ज्या मतदारसंघांमध्ये अधिक चुरस आहे. अशा ठिकाणी मतदारांना अधिकच ‘भाव’ आल्याची चर्चा होती. प्रचारादरम्यानच ज्या उमेदवारांची तिजोरी संपूर्णपणे रिकामी झाली. ते मात्र मतदानाच्या दिवशी हताश होऊन हा सर्व प्रकार पाहात राहिले. त्यांच्याकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही शिल्लकच न राहिल्याने ‘तुम्ही मला मतदान करा किंवा नका करू’ अशी त्यांची भूमिका राहिली.  
एकूणच उमेदवारांनीच मतदारांना लावलेली लक्ष्मीदर्शनाची सवय आता त्यांच्यासाठी घातक ठरल्याचे यावेळच्या मतदानावरून दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Huge amount of black money used in nashik during poll