श्रीगोंदे तालुक्यात मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी या भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार अनिल दौंडे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मिलिंद दरेकर, उपसभापती हरिदास शिर्के आदी या वेळी उपस्थित हाते. तालुक्यात मंगळवारी काही तासांतच १५५ मिलिमीटर (सहा इंच) पाऊस पडला. या पावसामुळे पावसाळा संपण्यापूर्वीच तालुक्यात सरासरी ओलांडली आहे. मढेवडगाव, चिंभळा व पडळी या भागांतील डाळिंब, कांदा, बाजरी, मका यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पाचपुते यांनी दिल्या.