धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पाचनई, कुमशेत परिसरात काल मुसळधार पाऊस कोसळला. रतनवाडी येथे २४ तासांत सव्वाचार इंच पाऊस पडला. या पावसामुळे भंडारदरा धरणात ३६ तासांत अर्धा टीएमसीपेक्षा अधिक नवीन पाण्याची आवक झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आता साडेसहा टीएमसी झाला असून, मुळा धरणाचा पाणीसाठा बारा टीएमसीपर्यंत पोहचला आहे. भंडारद-याच्या स्पीलवेचे गेट काल बंद करण्यात आले. त्यामुळे भंडारदरा धरण भरण्याबाबतची साशंकता सध्यातरी दूर झाली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन आठवडय़ांपासून कमीजास्त प्रमाणात पाऊस आपले सातत्य टिकवून आहे. मागील दोन, तीन दिवसांपासून कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनगडाच्या डोंगररांगात पावसाचा जोर चांगलाच वाढला. सकाळपर्यंतच्या २४ तासांत रतनवाडीला सर्वाधिक म्हणजे १०७ मिमी पावसाची नोंद झाली. आज सायंकाळी भंडाद-याचा पाणीसाठा ६ हजार ५७३ दलघफू झाला होता. धरणातून सध्या वीजनिर्मितीसाठी ८४९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
भंडारदरा धरणाच्या स्पीलवेची दारे उन्हाळ्यात रंगरंगोटी आणि देखभाल दुरुस्तीसाठी उघडण्यात आली होती. पावसाळा सुरू झाल्यानंतर दीड महिना झाला तरी ही दारे बंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे दारणा धरणाप्रमाणेच भंडारदरा धरणातूनही धरण भरण्यापूर्वीच जायकवाडीसाठी पाणी सोडले जाते की काय, याबाबत लाभक्षेत्रात चिंता होती. मात्र काल स्पीलवेची दारे बंद करण्यात आली. आज धरणातील पाण्याची पातळी १८९ फूट झाली. पाणी स्पीलवे गेटच्या तळाला लागले. त्यामुळे आता धरण भरू दिले जाण्याबाबतची अनिश्चितता संपल्यातच जमा आहे. धरणातील पाणीसाठा १० हजार ६०० दलघफूपेक्षा जास्त झाल्यानंतर त्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडले जाईल असे दिसते.
हरिश्चंद्रगड परिसरातील अंबित, पाचनई, कुमशेत, लव्हाळी परिसरातही काल रात्री जोरदार आषाढ सरी कोसळल्या. त्यामुळे मुळा नदी सध्या दुथडी भरून वाहात आहे. आज सकाळी कोतूळजवळ मुळा नदीपात्रातून ४ हजार ३२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मुळा धरणाचा पाणीसाठा सकाळी ११ हजार ७८७ दलघफूट झाला होता.
निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ातही चांगली वाढ होत आहे. सायंकाळी निळवंडे धरणातील साठा १ हजार ११६ दलघफू झाला होता. निळवंडे धरणातून सध्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण १ हजार ४०० क्युसेकपासून आज ७०० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आले.
तालुक्याच्या मुळा व प्रवरा खो-यात  समाधानकारक पाऊस असला तरी आढळा खो-यात मात्र अद्याप पाऊस नाही. आढळा पाणलोट क्षेत्रातील गावांना जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाडोशी लघुपाटबंधारे तलावातून काल पाणी सोडण्यात आले. १४६ दलघफूट क्षमता असणा-या पाडोशी तलावात पाणी सोडतेवेळी ११० दलघफू पाणीसाठा झाला होता.