मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यातील सात तालुक्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाला यापूर्वी ३५ बस देण्यात आलेल्या असून आता यात आणखी १४ बसची भर पडणार असून बुलढाणा विभागात मानव विकासच्या ४९ बस धावणार आहेत.
मानव विकासाच्या आयुक्तांनी १४ बसला मान्यता दिली असून प्रशासकीय पातळीवर २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. परिणामी, मानव विकास कार्यक्रमातंर्गत पूर्वीच्या बसबाबतची ओरड आता काही प्रमाणात कमी होणार आहे. केवळ शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी या बसचा वापर करण्याचे निर्देशही मानव विकास कार्यक्रमाच्या आयुक्तांनी दिले आहेत. जिल्ह्यात सात तालुक्यांमधील सुमारे २५० गावातील ११२ शाळांमधील विद्यार्थिनींच्या शाळेत ये-जा करण्याच्या सुविधेसाठी या बसचा लाभ घेत आहेत. आता प्रत्येक तालुक्यातील आणखी दोन बस वाढवून देण्यात येत आहेत. त्याची प्रशासकीय पातळीवर कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या सेवेत दाखल होतील. मार्च २०१४ मध्येच यासाठी लागणाऱ्या २ कोटी ८० हजार रुपयांच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सध्या या सातही तालुकानिहाय प्रत्येकी पाच बस धावत आहेत. मात्र, त्या नियमित वेळेत सोडण्यात याव्यात व शालेय विद्यार्थिनींनाच ये-जा करण्यासाठी त्यांचा उपयोग व्हावा, असा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, अलिकडे अन्य काही मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठीही या गाडय़ांचा वापर केला गेल्याच्या तक्रारी होत्या. संबंधितांना सूचनापत्रही पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यासाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे सध्या ३५ बस धावत आहेत. लोणार, सिंदखेडराजा, मेहकर या तालुक्यांच्या गाडय़ा मेहकर आगारातून, तर संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्याच्या फेऱ्या जळगाव जामोद आगार चालवत आहे. देऊळगावराजा, चिखली या तालुक्यात चिखली आगारामार्फत बस चालविल्या जात आहेत. मुलींच्या सुविधेसाठी त्यात आणखी दोन बसची भर पडणार असून एकूण १४ बस मिळणार आहेत. त्यासाठी प्रती बस २० लाख रुपयांप्रमाणे निधी प्रशासकीय पातळीवर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सोबतच सध्याच्या बसच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी वर्षांकाठी सुमारे साडेसात लाख रुपयांचा निधी थेट राज्य परिवहन महामंडळालाच देण्यात येत असतो.
मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या दृष्टीने राज्यातील २२ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक उत्पन्न वाढीसाठी जुलै २०११ पासून हा मानव विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पाच कि.मी.पेक्षा अधिक अंतरावर शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींसाठी मानव विकास कार्यक्रम बस उपलब्ध करून देत आहे.