क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेत हुंडेकरी अकादमी संघाने द इलेव्हन संघाचा २९ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. द इलेव्हन संघ उपविजेता ठरला. गेली १८ दिवस सुरु असलेल्या स्पर्धेचा आज समारोप झाला. हुंडेकरी संघाचा प्रदिप जगदाळे (१३४ धावा व १० बळी) मालिकावीर झाला.
अजय शितोळे (उत्कृष्ट फलंदाज, १३९ धावा, हुंडकेरी), सनी बनसोडे (उत्कृष्ट गोलंदाज, ८६ धावांत ११ बळी, द इलेव्हन), अभिजित दुधे (उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, हुंडेकरी) असे स्पर्धेचे मानकरी आहेत. आजच्या अंतिम लढतीत हुंडकेरी संघाचा जगदाळे (६६ धावांत ३ बळी) सामानावीर झाला.
स्पर्धेतील विजेतेपदासाठी आज वाडिया पार्क मैदानावर हुंडकेरी अकादमी व द इलेव्हन संघात लढत दुपारी सुरु झाली. हुंडेकरी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. संघाच्या प्रदिप जगदाळेने ६ चौकार टोलवत ४६ चेंडूत ६६ धावा जमवल्या. त्याला असिफ शेख (२७) व आझिम काझी (१७) साथ दिली. संघाने २० षटकांत ७ गडय़ांच्या मोबदल्यात १४२ धावा केल्या. द इलेव्हनच्या अमीर मोहम्मदने १६ धावांत ३ तर सनी बनसोडेने २१ धावांत १ गडी बाद केला.
प्रत्युत्तर देताना द इलेव्हन संघाची सुरुवात चांगली झाली. परंतु जगदाळेच्या गोलंदाजीने नंतरचे फलंदाज धावा जमवु शकले नाहीत. मुदस्सर तांबटकर (३०), अमिर मोहम्मद व जोिगदर तुमसकर प्रत्येकी १८ व जावेद सय्यदने १४ धावा केल्या. हुंडेकरीच्या जगदाळेने १० धावांत ३ तर इशांत राय, अभिजित दुधे व सोलोमन असलमराव यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. श्री शंतनु भावे व मिनीनाथ गाडिलकर यांनी पंच म्हणुन काम पाहिले.
सामन्यानंतर लगेचच प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक व लेखक शिरीष कणेकर यांच्या हस्ते व जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. अरुण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण करण्यात आले. महापौर शिला शिंदे, आदर्शगाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, माजी महापौर संग्राम जगताप, संघटनेचे सचिव संजय बोरा, कंपनीचे सरव्यवस्थापक विजय लेले आदी उपस्थित होते.