घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कुरार गावातील वातावरण गेल्या आठवडय़ात तंग बनले.. दुकाने बंद झाली.. तोडफोडही सुरू झाली.. वातावरण चिघळण्याआधीच मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने पुढाकार घेऊन बाबासाहेबांचा नवा पुतळा बसविल्याने तणाव निवळला, तरी संताप धुमसतच होता. सकाळी ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी सायंकाळी पाहिले आणि विटंबनेच्या घटनेमागचे वास्तव उजेडात आले. एक भुकेलेली बकरी पुतळ्याच्या गळ्यातील हार खेचत असल्याचे आणि त्यामुळे पुतळा खाली पडल्याचे दिसून आले.. हेच चित्रीकरण सकाळी पाहिले असते तर, तणाव पसरलाच नसता, असे त्यावेळी राहून राहून पोलिसांना वाटत होते..
कुरार गावातील क्रांतीनगर या परिसरात एका चौथऱ्यावर डॉ. बाबासाहेबांचा लहान पुतळा बसविण्यात आला होता. गेल्या आठवडय़ात सकाळच्या वेळी हा पुतळा खाली पडल्याचे आणि पुतळ्याचा डावा खांदा निखळल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि तणाव निर्माण झाला.. तो पुतळा मांडीवर घेऊन दीडशे-दोनशे महिलांच्या चमूने घटनास्थळी ठिय्या दिला.. दुकाने बंद करण्यात झाली.. तोडफोडही झाली.. समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु कुरार पोलीस ढिम्म होते.. एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होते तरी काहीही कारवाई केली जात नाही म्हणून माजी महापौर सुनील प्रभू यांनीही कुरार पोलिसांना धारेवरही धरले.. वातावरण तंग होणार अशीच चिन्हे होती..
याबाबतची माहिती मिळताच विशेष शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महिला निरीक्षक ज्योती बागुल-भोपळे यांनी पुढाकार घेतला आणि महिलांची समजूत घातली. तुटलेला पुतळा ताब्यात घेऊन तो समता नगर पोलीस ठाण्यात नेऊन ठेवण्यात महिला पोलीस निरीक्षकाला यश आले.. त्यांनी तात्काळ डॉ. बाबासाहेबांच्या नवा पुतळा तेथे आणला आणि त्याची स्थापना केली.. त्यामुळे तणाव निवळला. तरीही धुसफूस सुरू होती..
सुदैवाने या परिसरात सीसीटीव्ही होता.. त्यामुळे याबाबतची सीडी कुरार पोलिसांना देण्यात आली.. परंतु कुरार पोलिसांनी सायंकाळपर्यंत ही सीडी पाहण्याची तसदीही घेतली नाही.. प्रत्यक्ष सीडी पाहिली तेव्हा एक बकरी डॉ. बाबासाहेबांच्या गळ्यातील हार खेचत होती.. तो हार तिच्या तोंडात आला आणि पुतळा मात्र खाली पडला.. त्यामुळे डावा खांदा निखळला.. हे दृश्य पाहिल्यावर जागे झालेल्या पोलिसांनी क्रांतीनगर तसेच आसपासच्या परिसरातील नेतेमंडळी, कार्यकर्त्यांना पाचारण केले.. त्यांना हे दृश्य दाखविण्यात आले आणि तेही शरमले.. पुतळ्याच्या विटंबनामुळे होणाऱ्या एका अनर्थाचा सुखद शेवट झाल्याने पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला..