फरार गुन्हेगारांच्या वाढदिवसाचे सदिच्छा फलक काढण्याची जबाबदारी पोलिसांनी झटकली, एवढेच नव्हेतर गुन्हेगाराच्या समर्थकांना पोलिसी हिसका न दाखवता नगरपालिकेकडे बोट दाखविले. अखेर पालिकेनेच रात्री उशिरापर्यंत हे फलक काढून टाकले.
शहरातील सागर ऊर्फ चन्या बेग हा गुन्हेगार गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून फरार आहे. पोलिसांवर हल्ला करणे, धूमस्टाईल महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविणे, चो-या व दरोडे टाकणे असे गंभीर कृत्य तो करतो. अनेक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. कोल्हार भगवतीपूर येथील पतसंस्थेवर  भरदिवसा टाकलेल्या दरोडय़ात तो आरोपी आहे. चन्या बेगच्या समर्थकांनी यापूर्वी शहरात शिवजयंतीची मिरवणूक काढली होती. त्यानंतर आज बेग यांच्या समर्थकांनी वाढदिवसानिमित्त शहरात १५ ठिकाणी शुभेच्छा फलक लावले.
रात्रीच्या वेळी हे फलक लावत असताना पोलिसांनी त्यांना रोखले, पण १५ ते २० जण पोलीस ठाण्यात आले. आम्हाला फलक लावण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही फलक काढण्यास आम्हाला सांगू नका, असे पोलीस निरीक्षक सपकाळे यांना त्यांनी सांगितले. सकाळी परवानगी आणून दाखविण्याचेही त्यांनी कबूल केले. नंतर रात्री शहराच्या मुख्य चौकात बेग याला शुभेच्छा देणारे फलक झळकले. कुठलीही कारवाई न करता निरीक्षक सपकाळे यांनी पालिकेला पत्र दिले. त्या पत्रात बेगच्या गुन्हेगारी संबंधाचा कुठलाही उल्लेख नव्हता. इचलकरंजी व नेवासा येथे फलकावरील मजकुरावरून दंगली झाल्या आहेत. बेकायदा फलक लावल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते. त्यामुळे शहरात विनापरवाना लागलेल्या फलकावर कारवाई करावी, असे पत्रात नमूद केले होते. चन्याचा थेट उल्लेख करायला पोलीस घाबरले हे मात्र समजू शकले नाही.
पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी फलक काढून टाकण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले. रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा फलक काढण्याची कारवाई सुरू होती. विशेष म्हणजे पालिकेच्या कर्मचा-यांनी जीव मुठीत धरून हे फलक काढले. एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चिरंजीवांचा या फलक प्रकरणात सहभाग आहे. तसेच एका तरुणाची आज याप्रकरणी चौकशी केली. गुन्हेगाराला आश्रय देणा-यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. पण त्याच्या समर्थकावर काय कारवाई करता येईल, याचा शोध मात्र अद्याप पोलिसांना घेता आलेला नाही. आता कायद्याचा अभ्यास पोलीस करीत असून समर्थकांना सहआरोपी करण्याचा विचार सुरू आहे.