केंद्र सरकारने गांधी जयंतीचे निमित्त साधून देशभरात स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी स्वच्छता मोहीम छेडली. मात्र, नागपूरवर प्रेम करणाऱ्या काही नागपुरकरांनी न बोलताच स्वच्छतेची धुरा हाती घेतली. ‘आय लव्ह नागपूर’ या माध्यमातून गेल्या दोन आठवडय़ांपासून लॉयन्स क्लबची काही मंडळी शहरातले घाणेरडे झालेले ट्रॅफिक बुथ स्वच्छ करून ते रंगवण्याचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी चाळीशी पार केलेली आहेत आणि त्यांना हे काम करताना बघून आता काही युवतीदेखील त्यांच्या मदतीला येत आहेत. शहरात जागोजागी घाण पसरलेली आहे. विशेषत: वाहतूक नियंत्रण कक्ष अक्षरश: जाहिरातीने भरलेले आहेत. तर काही कक्षांमध्ये वाहतूक पोलिसच राहात नसल्याने दारूच्या रिकाम्या बॉटल्ससह घाण पडलेली आहे. शहरातील उड्डाणपुलाचे खांबसुद्धा जाहिरातीने भरलेले आहेत. बाहेरुन येणाऱ्या माणसाला आपले शहर घाण नको तर स्वच्छ दिसायला हवे. त्यामुळे आठवडय़ाच्या प्रत्येक रविवारी ही मोहीम राबवली जात आहे. आम्ही कुणालाही या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आव्हान करीत नसून‘काम चालू तोंड बंद’ या पद्धतीने काम सुरू आहे. शहर आपले असल्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे, असे आयसॉ व लॉयन्स क्लबचे प्रमोद कानेटकर म्हणाले.