आपल्याकडे संगीत रंगभूमीची प्रदीर्घ परंपरा असली तरी सध्या मात्र संगीत नाटकांची संख्या कमालीची घटली आहे. संगीत रंगभूमीसमोर अनेक समस्या असून आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेन, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आणि ९५ व्या नाटय़ संमेलनाध्यक्षा फैय्याज यांनी केले.  येथील पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन रविवारी गडकरी रंगायतन येथे फैय्याज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ठाणेकर रसिकांशी संवाद साधला. राम मराठे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा होत असलेल्या संगीत सोहळ्याचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. १९९२ मध्ये गडकरी रंगायतनमध्ये पं. राम मराठे यांच्या तसबिरीच्या अनावरण सोहळ्यासही आपल्या उपस्थितीचे स्मरण त्यांनी यावेळी करून दिले. नाटय़संमेलनाध्यक्ष हे केवळ शोभेचे पद असून एका वर्षांच्या काळात पुरेसे काम करता येत नाही. प्रभाकर पणशीकरांना नाटय़संमेलनाचे तीन वर्ष अध्यक्षपद भूषविता आले होते. आपणासही एक वर्षांपेक्षा अधिक काळ या पदावर राहण्याची संधी मिळाली तर नक्कीच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असेही फैय्याज म्हणाल्या. ‘कट्टय़ार काळजात घुसली’ या नाटकातील ‘लागी कलेजवॉं कटय़ार..सॉंवरिया से नैना हो गये चार..’ हे नाटय़पद गाऊन फैय्याज यांनी संगीत नाटय़ महोत्सवाची सुरेल सुरुवात केली. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भोपाळ स्थित ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका श्रद्धा जैन यांनी आपल्या गायनाने रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर संतुर वाद्याला जगविख्यात करणाऱ्या पं. शिवकुमार शर्मा यांचे पुत्र  राहुल शर्मा यांनी आपल्या खास शैलीतील संतुर वादनाने रसिकांना सुरांची मैफल घडवली.