तालुक्यातून माधव महाराज घुले यांच्या नेतृत्वाखाली बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले सुमारे ३३ भाविक डेहराडून येथे सुरक्षित असून त्यांच्याशी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा संपर्क झाला असल्याची माहिती पांडूरंग शिंदे यांनी दिली.
उत्तराखंड मध्ये झालेल्या मुसळधार वृष्टीचा महाराष्ट्रातून गेलेल्या अनेक भाविकांना फटका बसला. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक संख्येने इगतपुरी तालुक्यातील भाविक उत्तराखंडमध्ये गेलेले आहेत. मठाधिपती माधव महाराज घुले, अशोक महाराज धांडे हे भाविकांच्या या गटाचे नेतृत्व करीत आहेत. तब्बल ३३ जणांचा समावेश असलेल्या या गटाशी तीन दिवसांपासून कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांचे नातेवाईक काळजीत होते.
इगतपुरी तालुक्यातील ३३ , नाशिक ११, सिन्नर दोन आणि धुळ्यातील एक असे ४७ भाविक एका ट्रॅव्हल बसने चार धामच्या यात्रेकरिता गेले आहेत. ऋषिकेश पर्यंत गेल्यानंतर पुढे जाण्यासाठी त्यांना स्थानिक वाहनाचा वापर करावा लागला. परंतु अकस्मात आलेल्या पुरामुळे या सर्व भाविकांचा पुढे जाण्याचा आणि मागे फिरण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे तीन दिवसांपासून त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला असता हे सर्व भाविक डेहराडून येथे सुरक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले.