सहा जानेवारी रोजी शहरातील कालिका मंदिर परिसरात अवैध धंद्यांवरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्यानंतर त्याचे पडसाद दोन दिवस उमटले. दंगलीची अफवा पसरून तणावही निर्माण झाला होता. ही परिस्थिती शहरातील शांतता बिघडविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता असूनही पोलिसांकडून अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याचे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी अशी घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सतर्क राहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
धुळ्यातील दंगलीच्या पाश्र्वभूमीवर आधीच तणावात असलेल्या शहरात दंगलीच्या अफवेने बाजारपेठ पटापट बंद झाली होती. पण पोलिसांनी प्रत्येक वेळी त्वरित हस्तक्षेप केल्याने जळगावात वेळीच शांतता प्रस्थापित झाली. शहरात अवैध धंद्यांच्या कारणावरून दंगल झाल्याचे स्पष्ट असताना व त्यामुळे शहरातील शांतता भंग पावलेली असताना पोलीस प्रशासनाने त्या विरोधात सत्र चालविले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील शनिपेठ, जिल्हा पेठ, औद्योगिक वसाहत व तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याची चर्चा आहे.