शहरात ‘सोशल क्लब’च्या नावाने सुरू असलेल्या जुगार अड्डय़ांच्या वादामुळे एका तरुणाचा रहस्यमय मृत्यू झाला असून, या घटनेमुळे शहरातील अवैध व्यवसायांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
शहरात सामाजिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा मंडळाची रीतसर नोंदणी करून त्याअंतर्गत जुगाराचे अड्डे चालतात हे जगजाहीर आहे. पोलिसांना हे अड्डे कोणाचे आहेत, याविषयी माहिती असतानाही कोणतीच कारवाई होत नाही अशी नागरिकांची ओरड आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी अशा अड्डय़ांवर काही काळ जरब निर्माण केली होती; परंतु ते शहरातून गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे ’ झाली आहे. शनिवारी औद्योगिक वसाहत परिसरातील सोशल क्लबमध्ये वाद झाला. या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला. हा खून असल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे, तर ही आत्महत्या असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण होऊन दंगलीची अफवा पसरली होती. त्यामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.
धुडकू सपकाळे नामक व्यक्तीचे शहरातील बऱ्याच भागात जुगाराचे अड्डे आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अशाच एका अड्डय़ावर मेहरूण परिसरातील युनूस नबी शेख (२८) हा सदस्य कार्यरत होता. हमाली व्यवसाय करणाऱ्या युनूसवर सपकाळे व इतरांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. ते वसूल करण्यासाठी युनूसवर जबरदस्ती केली जात होती. त्या त्रासापोटीच त्याने गळफास घेतल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री घरातून गेलेला युनूस शनिवारी दुपापर्यंत घरी परतला नाही. नंतर त्याने आत्महत्या केल्याचा निरोप आला. तथापि, घटनास्थळी नातलग गेले असता तेथील सर्व प्रकार त्यांना संशयास्पद वाटला. त्यामुळे ती आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने क्लबसह सपकाळे, गायकवाड व इतरांच्या घरांची, वाहनांची नासधूस केली. या घटनेने अवैध व्यवसायांवर पोलिसांचे नियंत्रणच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.