महिन्याभरापूर्वी कळंबोली वसाहतीमधील सेंट जोसेफ शाळेच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून विघ्नेश साळुंखे या विद्यार्थ्यांचा पडून मृत्यू झाला. या शाळेच्या इमारतीला दुसऱ्या मजल्यापर्यंतच भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचे सत्य उजेडात आले आहे.
साडेसात हजार विद्यार्थ्यांना शालेय इमारतीच्या छताखाली शिस्तीचे शिक्षण देणारी सेंट जोसेफ ही शाळा कळंबोली परिसरात प्रसिद्ध आहे. मात्र एक मजली शाळेचे पाच मजली शाळेच्या इमारतीमध्ये रूपांतर केल्यानंतर सेंट जोसेफ शाळेच्या संचालक मंडळाने सिडको प्रशासनाच्या बांधकाम विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवत दोन वर्षांपासून येथील दुसऱ्या मजल्यावरील संपूर्ण बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र नसताना येथे शाळेचे वर्ग सुरू केल्याचे उघड झाले आहे. सेंट जोसेफ शाळेच्या पाच मजली इमारतीला बांधण्याची परवानगी सिडकोने २०१३ साली दिली, परंतु इमारतीच्या बांधकामानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र बांधकामातील विविध त्रुटींमुळे मिळू शकले नाही. कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे हे भोगवटा प्रमाणपत्र दिले गेले नाही. हे सत्य विघ्नेश साळुंखे या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे उजेडात आले. या शाळेच्या इमारतीच्या बांधकामामध्ये नियमांचा भंग करून अतिरिक्त बांधकाम केले, तसेच शालेय इमारतीचे वास्तुविशारदांनी दर्शविलेल्या नकाशानुसार विनापरवानगीने काही ठिकाणी दरवाजा असताना मोकळी जागा ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.
सिडकोच्या बांधकाम विभागाने या शाळेच्या बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्राची छाननी केल्यावर या त्रुटी समोर आल्या. विशेष म्हणजे विघ्नेशने १७ जुलैला सकाळी छतावर जाण्यासाठी ज्या मोकळ्या जागेवरील अध्र्या भिंतीवरून उडी मारल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात दिसते त्या ठिकाणी दरवाजा असल्याचे सिडकोकडे शाळा बांधकाम परवानगी करण्यासाठी दिलेल्या नकाशात शाळेच्या वतीने म्हटले आहे. या बेकायदा शाळेच्या इमारतीच्या चर्चेमुळे शाळेच्या संचालक मंडळ व या इमारतीचे वास्तुविशारद यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी कळंबोलीच्या पालकांकडून होत आहे.
एका महिन्यानंतरही विघ्नेशच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक माहिती देणे टाळले आहे. मात्र शाळेच्या या इमारतीच्या बेकायदा बांधकामामुळे शाळेच्या संचालक मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून ते विश्वस्तांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे कळते. यापूर्वी शाळा व्यवस्थापनातील मुख्याध्यापिका, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरीही या गुन्ह्य़ांमध्ये संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सिडकोवर दबाव..
सिडको हद्दीमध्ये प्रकल्पग्रस्तांची बेकायदा घरे व इमारती तोंडण्यासाठी सिडको प्रशासन मोठय़ा प्रमाणात लवाजमा वापरते. मात्र दोन वर्षांपासून अधिक काळ सेंट जोसेफ शाळेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होऊ शकले नाही, तरीही या शाळेविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. याला राजकीय दबाव असल्याचे सिडको प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगितले जाते. सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या बेकायदा इमारतीला सिडको अधिकृत कधी व कसे करेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सेंट जोसेफच्या या भोगवटा प्रमाणपत्राच्या खुलाशामुळे इतर शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहेत.