ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील सहा पदरी रस्त्याचे काम रखडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दिघा बाबा मंदिरापासून ते रिलायबल प्लाझापर्यंतच्या दोन मिनिटांच्या अंतरास २० ते २५ मिनिटे लागत आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथे सहा पदरी रस्त्याचे काम रस्त्यावरील दुकानदारांचे पुनर्वसन न झाल्यामुळे रखडले आहे. त्यातच दिघा बाबा मंदिरापासून संजय गांधी नगपर्यंतच्या पदपथावर व रस्त्यावर दुकानदार व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. ठाणे ते वाशी मार्गावर साठेनगपर्यंत वाहतूक कोंडी होते असते. रस्ता अंरुद असल्याने वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पदपथ दुकानदारांनी गिळंकृत केल्यामुळे व रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांमधून वाट काढत जावे लागते. या रस्त्यावर काही राजकीय गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते खुच्र्या टाकून बसलेले असतात. त्यामुळे तेथून जाणाऱ्या महिलांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो, अशा तक्रारी आहेत.
पदपथावर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे व रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्त्याने चालणे कठीण होते. वाहतूक कोंडीत उभ्या असणाऱ्या वाहनांमधून वाट काढत येथून जात असताना अनेकदा वाहनाचे धक्के पादचाऱ्यांना लागल्याने बाचाबाची होण्याच्या घटना घडतात. तरी हे पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करून देण्यात यावेत, अशी मागणी येथील रहिवासी सुनील बर्वे यांनी केली आहे. दुकानदारांकडून होत असलेल्या अतिक्रमणाबाबत ऐरोली विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ज्या दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.