जिल्हा क्रिकेट संघटना संस्थेची सध्याची कार्यकारिणी स्वयंघोषित व बेकायदेशीर असल्याने ती बरखास्त करून त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी व क्रिकेट खेळ व खेळाडूंना योग्य न्याय देण्यासाठी धर्मदाय आयुक्तांनी क्रिकेट क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून, उच्च दर्जाच्या खेळाडूंची नवीन कार्यकारिणी नियुक्त करावी, अशी मागणी संघटनेचे माजी सचिव व आजीव सदस्य ओमप्रकाश राठोड यांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली आहे.
खेळाडूंना न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, सहकारमंत्री, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, महाराष्ट्र क्रिकेट संघटना (पुणे) व संघटनेचे पदसिद्ध उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. महिन्यापूर्वी पाठवलेल्या या निवेदनाची अद्याप धर्मदाय आयुक्तांनी काहीच दखल घेतली नसल्याचे  राठोड यांनी सांगितले.
संघटनेच्या कार्यकारिणीत सभासदच नसलेल्या ७ ते ८ जण आहेत, त्यांचा क्रिकेट खेळाशी काडीमात्र संबंध नाही, असे नमूद करुन राठोड यांनी निवेदनात म्हटले की, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनच मिळालेल्या कागदपत्रानुसार सध्याच्या कार्यकारिणीने गेल्या किमान १४ वर्षांत कोणताही हिशेब सादर केला नाही, चेंज रिपोर्ट सादर केला नाही. कार्यकारिणी राजकीय संबंधाचा गैरवापर करून बेकायदा कारभार करत आहे.
संस्थेने आपल्या कारभाराची, हिशेबाची माहिती वेळोवेळी आपणाकडे देणे बंधनकारक असताना १९९९ पासून कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आपल्याच अधिकारात संस्थेवर कठोर कारवाई करून प्रशासक नेमणे अपेक्षित होते, परंतु आपल्या कार्यालयाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, वोपले कार्यालयही गैरकृत्यात सहभागी आहे, असे खेदाने म्हणावे लागते याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
संस्थेची सध्याची कार्यकारिणी बरखास्त करून त्यांच्यावर कारवाई करावी व उच्च खेळाडूं नवी कार्यकारिणी नियुक्त करावी, अन्यथा उपोषणास बसावे लागेल, असेही नमूद करण्यात आले आहे.