सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालयाच्या मैदानात पुरून ठेवलेल्या पोषण आहाराच्या तांदळाची पाहणी करण्यास गेलेल्या तहसीलदार सारंग चव्हाण यांना या विद्यालयात अवैध वाळूसाठा केल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी विद्यालयास सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम सात दिवसांत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या विद्यालयात पोषण आहाराचा तांदूळ पुरल्याची माहिती मिळताच तहसीलदार चव्हाण यांनी तेथे जाऊन पाहणी केली. या प्रकरणी तपासानंतर दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी सेनगाव पंचायत समिती शिक्षण विभागाला दिल्या. या तपासाचे काम बुधवारी दुपापर्यंत गटशिक्षण अधिकारी टारफे यांच्याकडून चालूच असल्याने पोषण आहारप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
दरम्यान, याच विद्यालयाच्या मैदानात सुमारे साडेतीनशे ब्रास अवैध वाळूचा साठा केल्याचे तहसीलदार चव्हाण यांना येथे भेट दिली असता आढळून आले. त्यांनी या बाबत चौकशी केली व या प्रकरणी महसूल भरल्याबाबत विचारणा केली. परंतु मुख्याध्यापक व विद्यालय प्रशासनाकडे महसूल भरल्याच्या कोणत्याच पावत्या सापडल्या नाहीत. अखेर तहसीलदारांनी या दोघांना अवैध वाळू साठाप्रकरणी सव्वापाच लाख रुपये दंड ठोठावला. सात दिवसांत हा दंड भरण्यास फर्मावले. दंडाची रक्कम न भरल्यास जप्त वाळूचा लिलाव जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.