भावी पिढी ही देशाची आधारस्तंभ असल्यामुळे नवी पिढी उत्तम व सक्षम निर्माण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केले.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  कोल्हापूर जिल्हा आज क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, सहकार या सर्व क्षेत्रात जरी प्रगत असला, तरी मुलींच्या जन्मदराबाबत राज्यात मागे आहे. जिल्ह्याचे मुलींचे प्रमाण ८३६ आहे. ते वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे श्री. पाटील या वेळी म्हणाले.
या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजयसिंह मंडलिक,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष िहदुराव चौगले,  जिल्हाधिकारी राजाराम माने, विशेष पोलिस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यात ८ लाख बालके असून ५० हजार मुलांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे असे सांगितले. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी आर. एस. आडकेकर, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.