अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या अनिल जगन्नाथ पवार (वय ४५) याला श्रीरामपूर येथील जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेली त्याची पत्नी ज्योती गंगाधर गायकवाड हिने मोठय़ा धाडसाने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी संचित रजेवर येऊन फरार होतो अन् कृष्णकृत्य करतो. पोलिसांनाही तो सापडत नाही. त्यामुळे एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलींचे बळी गेले. त्या वेळी ९ दिवस आधी पकडला गेला असता तर एका मुलीचा जीव वाचला असता.
रस्तापूर (ता. नेवासे) येथील अंबिका आसाराम डुक्रे (वय १८), नगर येथील नूतन माणिक हतीदास, कोऱ्हाळे (ता. राहाता) येथील जयश्री डांगे (वय १३) यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून पवार याने केला. तर चितळी (ता. राहाता) येथील महिलेचा विनयभंग करून तिला विहिरीत फेकून दिले, पण ती सुदैवाने बचावली. अशा विकृत मनोवत्तीच्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली. त्याने पोलिसांनाही जेरीस आणले होते. अखेर न्याय मिळाला.
सुभाषवाडी (ता. श्रीरामपूर) येथील सुभाष जगन्नाथ पवार हा नगर येथील महाविद्यालयात रखवालदार म्हणून काम करत होता. त्याने माणिक हतीदास या जेवणाचे डबे पुरविणाऱ्या महिलेशी लगट करून मैत्री केली. दि. २२ ऑक्टोबर १९९५ रोजी मित्राच्या लॅबमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला. १९९७ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दि. २२ सप्टेंबर २००३ ते ७ ऑक्टोबर २००३ या कालावधीत १४ दिवसांच्या रजेवर तो आला. रजा संपल्यानंतर येरवडा कारागृहात तो परतलाच नाही. कारागृहाने अथवा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. तेथूनच त्याच्या कृष्णकृत्याला पुन्हा प्रारंभ झाला.
या काळात त्याने ज्योती गंगाधर गायकवाड हिच्याशी लग्न केले. जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते. पवार हा कामधंद्याच्या निमित्ताने चितळी (ता. राहाता) येथे गेला. दि. २८ डिसेंबर २००४ रोजी चितळी येथे एका महिलेचा विनयभंग करून तिला त्याने विहिरीत ढकलून दिले. पण सुदैवाने ती बचावली. त्या वेळीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या तर पुढे दोन मुलींचे जीव वाचले असते. फरार झालेला पवार हा पत्नी ज्योती हिला घेऊन तो रस्तापूर येथे मावशी भीमाबाई माळी हिच्याकडे गेला. तेथे मजुरीचे काम करत असे. सैन्यात आपण मेजर असल्याचे लोकांना सांगे.
अंबिका डुक्रे ही १ सप्टेंबर २००६ रोजी शाळेत जाण्यापूर्वी प्रातर्विधीसाठी उसाच्या शेतात गेली असता तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करून फरार झाला. तब्बल ७ वर्षे ३ महिने तो फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी आश्रय देणाऱ्या दहा जणांसह त्याच्या आईवडिलांनाही अटक केली होती. पण काही उपयोग झाला नव्हता. सुकेवाडी (ता. संगमनेर) येथे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी सापळा लावून पकडण्याचा प्रयत्न केला. पण १० फुटांवरून तो पळून गेला. त्याची पत्नी ज्योती ही हाती लागली. नंतर फरार असलेल्या पवार याने १३ ऑगस्ट २०११ रोजी डोऱ्हाळे येथील जयश्री डांगे हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर ९ दिवसांनी त्याला पोलिसांनी कोपरगाव रेल्वेस्थानकावर अटक केली.
अंबिका डुक्रे खूनप्रकरणाचा तपास आधी सहायक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार नंतर पोलीस उपअधीक्षक जयसिंग दाभाडे यांनी केला. आरोपी फरार असतानाच पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. पण सीआयडीने पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याखेरीज काहीही तपासात केले नाही. साधा आरोपी पकडता आला नाही. त्यांच्या निष्क्रियतेमुळे जयश्रीचाही बळी गेला. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या पथकाने पवार याला जेरबंद केले. सीआयडीकडे तपासासाठी गुन्हा सोपविल्यानंतर काय घडते हे उघड झाले आहे.
मृत अंबिका हिच्या वडिलांचे निधन झालेले होते. ती शिवणकाम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवून बारावीचे शिक्षण घेत होती. कुटुंब संगोपनासाठी झटत होती. पण दुर्दैवाने तिने स्वत:च्या चारित्र्यासाठी पवार या नराधमाबरोबर झुंज दिली. त्यात तिचा बळी घेतला गेला. तिचा धाकटा भाऊ खुनाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात होता. रागाच्या भरात न्यायालयाच्या आवारात सागर डुक्रे याने पवार याच्यावर हल्ला केला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही घडले नाही.
पवार याला फाशीची शिक्षा होण्यास त्याची पत्नी ज्योती हिचा मोठा हातभार लागला. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या ज्योती हिने पवार याच्या कृष्णकृत्याचा पाढा न्यायालयापुढे वाचला. अंबिकाचा खून करून आल्यानंतर पवारचे कपडे चिखलाने व रक्ताने माखलेले होते. त्याने अंबिकाचा खून केल्याचे मला सांगितले. माझीही फसवणूक केली. जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे माझ्यापासून लपवून ठेवले. पवार हा महिलांसाठी विकृत व धोकादायक आहे असे तिने साक्ष देताना न्यायालयापुढे स्पष्ट केले. पत्नीच्या कणखरपणामुळे नराधम पवार याला मरेपर्यंत शिक्षा सुनावण्यास हातभार लागला. येथील न्यायालयात दोन वर्षांपूर्वी माळीचिंचोरे (ता. नेवासे) येथील निसार शेख यास फाशीची शिक्षा सुनावली होती. शेख याने गरोदर महिलेला पेटवून दिले होते. तिचा दोन वर्षांचा मुलगा रडायला लागला म्हणून त्यालाही आगीत टाकले होते. या तिहेरी हत्याकांडातही सरकारी वकील भानुदास तांबे यांनीच काम पाहिले होते. आता दुसऱ्या नराधमाला त्यांच्या युक्तिवादाने फाशीची शिक्षा मिळाली आहे.