कुर्डूवाडी येथील एका ५५ वर्षांच्या महिलेचा शेतजमिनीच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी भरलेल्या खटल्यात तानाजी मारुती कोळेकर (वय २३, रा. आवार पिंपरी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर दुय्यम निबंधक कालिदास अभंग यांच्यासह पाचजणांना निर्दोष मुक्त ठरविले.
कस्तुरबाई महादेव टोणपे (वय ५५, रा. कुर्डूवाडी) हिच्या मालकीच्या आवार पिंपरी (ता.परांडा) येथील शेतजमिनीचा आरोपी तानाजी कोळेकर याने खरेदी व्यवहार ठरविला होता. परंतु नंतर कस्तुरबाई ही आपली जमीन खरेदी देण्यास टाळाटाळ करू लागली. तेव्हा तानाजी कोळेकर याने परांडा येथील दुय्यम निबंधक कालिदास अभंग व बॉन्डरायटर रवींद्र संपत जगताप आणि अजीज मुजावर यांच्या मदतीने कस्तुरबाई टोणपे हिच्या मालकीच्या शेतजमिनीचे बेकायदेशीर व बनावट मुखत्यारपत्र तयार करून त्यावर आरोपी दुय्यम निबंधक कालिदास अभंग याने कस्तुरबाई ही समक्ष हजर नसताना तिच्याऐवजी दुसऱ्याच महिलेचे छायाचित्र चिटकवून त्या दस्तास आरोपी तुकाराम मारकड व परेश दीक्षित यांनी समक्ष ओळखत असल्याबद्दल साक्षीदार म्हणून सहय़ा घेतल्या आणि कस्तुरबाई हिची फसवणूक केली. त्यानंतर आरोपी तानाजी कोळेकर याने कस्तुरबाई हिच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून शेताचा व्यवहार मिटवून टाकू, असे म्हणून तिला आवार पिंपरी येथे बोलावून घेतले. नंतर त्याने तिचा डोक्यात खोरे घालून खून केला. नंतर प्रेत खड्डय़ात पुरून टाकून गुन्हय़ाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृत कस्तुरबाई हिचा मुलगा किशोर टोणपे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे अॅड. इनायतअली शेख यांनी युक्तिवाद केला. तर आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. अरेकर यांनी बचाव केला. मूळ फिर्यादीतर्फे अॅड. प्रशांत देशमुख यांनी काम पाहिले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
महिलेच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप
कुर्डूवाडी येथील एका ५५ वर्षांच्या महिलेचा शेतजमिनीच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी भरलेल्या खटल्यात तानाजी मारुती कोळेकर (वय २३, रा. आवार पिंपरी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर दुय्यम निबंधक कालिदास अभंग यांच्यासह पाचजणांना निर्दोष मुक्त ठरविले.
First published on: 24-12-2012 at 08:21 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imprisonment to a person in murder case of women