कुर्ला पश्चिमेच्या गजबजलेल्या फॅक्टरी रोडवरील बँकेसमोर एका तरुणावर हल्ला करून त्याला लुटल्याच्या घटनेने कुर्ला पोलिसांची झोप उडाली होती. भर दुपारी हल्ला कसा झाला, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. पण नंतर पोलिसांच्या सखोल तपासात या लुटीमागचे सत्य समोर आले.
 इम्तियाज शेख (३४) हे व्यावसायिक कुल्र्यात राहातात. फहाद शेख हा तरुण त्यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून काम करतो. फहाद सगळे आर्थिक व्यवहार सांभाळत असे. १६ जून रोजी शेख यांनी फहादला नेहमीप्रमाणे १ लाख ७० हजार रुपये बँकेत भरण्यासाठी दिले. हे पैसे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आले होते. दुपारी अडीचच्या सुमारास फॅक्टरी रोडवरील आयसीआयसीआय बँकेसमोरच दोन इसमांनी फहादला अडविले आणि त्याच्यावर ब्लेडने वार करून त्याच्याकडील पैशांची बॅग लुटून नेली. जखमी अवस्थेत फहाद पोलीस ठाण्यात आला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला. गजबजलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने लुटीची घटना घडल्याने पोलीसही चक्रावले होते.
कुर्ला पोलिसानी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अखेर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांनी फिर्यादी फहादची चौकशी केली. त्याने सांगितले की हल्लेखोरांच्या हातात चॉपर होता पण माझ्या हातावर त्यांनी ब्लेडने वार केले. चॉपर असताना हल्लेखोर ब्लेडने का वार करतील, असा प्रश्न पोलिसांना पडला आणि त्यांना फहादचाच संशय आला. फहादच्या बोलण्यात अजून एक विसंगती होती. हल्लेखोरांनी एका हाताने वार केले तर दुसऱ्या हाताने मोबाइल काढला, असे तो सांगत होता. ते शक्य नव्हते. पोलिसांचा संशय बळावला. मग त्याला बोलते केल्यानंतर त्याने स्वत:च हा बनाव रचल्याची कबुली दिली.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत म्हणाले की, फहाद शेख याने चुलत भाऊ अस्लम शेख (२२) याच्या मदतीने ही योजना आखली होती. भर रस्त्यात अनोळखी लोकांनी लुटल्याचा बनाव त्यांनी केला होता. आपला बनाव खपून जाईल, अशी त्यांना खात्री होती. पण त्याच्या बोलण्यातील विसंगतीवरून पोलिसांनी लगेच त्यांना पकडले. पोलिसांनी बुधवारी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेली सर्वच्या सर्व म्हणजे १ लाख ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.