गेली अनेक वर्षे शिधापत्रिकेसाठी प्रयत्न करत असलेल्या गांधीनगर (चोभे कॉलनी) येथील सुमारे १५० कुटुंबांना अखेर शिधापत्रिका मिळाल्या. या शिधापत्रिकांचे जाहीर कार्यक्रमात वाटप झाले.
भारीप बहुजन महासंघाच्या वतीने यासाठी प्रयत्न करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पातारे, बाळासाहेब वाघमारे यांनी यासाठी सातत्याने जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. वारंवार आंदोलन केले, धरणे धरले. त्यामुळे पुरवठा विभागाला याची दखल घेऊन सर्व कुटुंबांना शिधापत्रिका द्याव्या लागल्या.
संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही असा धडा यातूून सर्वानी घ्यायला हवा असे यावेळी पातारे यांनी सांगितले. संघटना असेल तर कामे होतात, नाही तर कोणी विचारत नाही असे ते म्हणाले. मनिषा नाईक, रेखा धाडगे, परिघाबाई औटी, मंदाताई कांबळे, पुष्पा टकले, सविता काळे, किशोर चव्हाण, सुरेश पठारे, महादेव माने आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.