भद्रकाली परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ

दलित मुस्लीम क्रांती मंचची तक्रार भद्रकाली परिसरात अवैध धंदे वाढीस लागले असून यासंदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा दलित मुस्लीम क्रांती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दलित मुस्लीम क्रांती मंचची तक्रार
भद्रकाली परिसरात अवैध धंदे वाढीस लागले असून यासंदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा दलित मुस्लीम क्रांती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यांसदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गांजा, चरस, भांग यांसारखे अंमली पदार्थ, अवैध लॉटरी, मटक्याचे अड्डे, पत्त्यांचे क्लब, वेश्या व्यवसाय, खाद्यपदार्थ विकण्याचा परवाना असलेल्या हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी खास बैठक, व्हिडीओगृहात अश्लील चित्रपट दाखविणे असे एक ना अनेक अवैध धंदे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिनबोभाट सुरू असून पोलीस यंत्रणेतील काही जणांचा या व्यवसायांना आशीर्वाद असल्याचे म्हटले जाते. हा परिसर अत्यंत संवेदनशील समजला जातो. या संवेदनशील परिसरातच अवैध धंदे बोकाळल्याने परिसराची शांतता कधीही धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या भागात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात आली असली तरी या चौक्यांमध्ये पोलीसच नसतात. बहुतांश पोलीस चौक्या बंद स्थितीत असल्याने किरकोळ वाददेखील मोठे स्वरूप धारण करू शकतो असेही निवेदनात म्हटले आहे.
भद्रकाली परिसरात सावकारीचा व्यवसायही तेजीत आहे. लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून धनादेश किंवा मुद्रांकावर दस्तऐवज लिहून घेऊन पिळवणूक केली जाते. परंतु त्यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. अवैध सावकारीचा धंदा करणारे वसुलीकरिता गुन्हेगारांची मदत घेत असल्याने नागरिकांना धमकावून वसुली करण्याचे व त्यांचे शोषण करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. भद्रकाली ठाण्यांतर्गत येणाऱ्या अनेक हॉटेलांमध्ये अवैधरीत्या दारू विक्री करण्यात येते. हॉटेलच्या नावाखाली दारू पिण्याचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांच्या लेखी नोंद असलेले गुन्हेगारही समाजामध्ये उजळ माथ्याने वावरताना दिसतात. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत पोलीस तत्परता दाखवीत नसल्याने अवैध धंद्यांबरोबर गुन्हेगारीत वाढ होत आहे. अशा लोकांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्याविरुद्ध कार्यवाही होत नसल्याची तक्रार मंचचे कार्याध्यक्ष अझहर अहमद शेख, जिल्हा महिला अध्यक्षा मुन्नी जुम्मन पठाण, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सोनवणे, ज्ञानदेव गवळी, रविभाऊ गांगुर्डे आदींनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increase in illegal business in bhadrakali area

ताज्या बातम्या