छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्ह्य़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरूण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांना शुक्रवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास अधिका-यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांच्यासमोर हजर केले असता या तिघा पोलिसांना २७ जानेवारीपर्यंत वाढीव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या तिघांतर्फे उद्या सत्र न्यायालयात जामीन अर्जही दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक अरूण वायकर (४८) यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन चौगुले (३७) व पोलीस नाईक कृष्णात सुरवसे (३७) हे तिघे जण गेल्या १२ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा राज्य अन्वेषण विभागाच्या स्थानिक कार्यालयात जाऊन हजर झाले होते. त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध कायदा २०१० चे कलम ४) अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. स्थानिक पोलीस यंत्रणेकडून या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही यासंदर्भात स्वत:हून गंभीर दखल घेतल्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वायकर व इतर दोघा पोलिसांना यापूर्वी मिळालेली पाच दिवसांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे या तिघांना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक ए. के. व्हनकडे यांनी पुन्हा शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी भोसले यांच्यासमोर हजर केले. पोलीस कोठडी मिळविण्याचा हक्क अबाधित ठेवून या तिघा आरोपी पोलिसांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सुनावणी होऊन २७ जानेवारीपर्यंत वाढीव न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. या वेळी सरकारतर्फे अ‍ॅड. अल्पना कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
दरम्यान, आरोपी पोलिसांनी दाखल केलेला जामीन अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी भोसले यांनी यापूर्वी फेटाळला होता. त्यामुळे आता सत्र न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे आरोपीतर्फे काम पाहणारे अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी सांगितले.