महिलांच्या लैंगिक छळप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या पोलीस कोठडीत आज आणखी दोन दिवसांनी वाढ करण्यात आली. माने तपासकार्यात कुठल्याही प्रकारचे सहाय्य करत नसल्याचे पोलिसांनी या वेळी न्यायालयास सांगितले. दरम्यान या प्रकरणातील तक्रारदार महिलांनी आपल्यावर माने यांनी अत्याचार केल्याचे तसेच आपल्याला कुणीही डांबून ठेवले नसल्याचा खुलासा आज माध्यमांसमोर केला आहे.
तब्बल सहा महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या विरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी त्यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. आज या कोठडीची मुदत संपताच माने यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी माने तपासकामात कुठलेही सहकार्य करत नाहीत. याबाबत कुठलीही माहिती, कागदपत्रे देण्यास ते टाळाटाळ करत आहेत. तसेच या गुन्हात त्यांच्याबरोबर हव्या असलेल्या मनीषा गुरव याही अद्याप बेपत्ता असल्याने माने यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांच्या वतीने न्यायालयास करण्यात आली. यावर न्यायालयाने माने यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
तक्रारदार महिलांचा खुलासा
दरम्यान याप्रकरणातील पीडित महिलांनी आपल्याला कुणीही डांबून ठेवले नसल्याचा खुलासा आज केला आहे. या महिलांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने या तक्रारी दाखल करून घेतल्या जात असल्याचा आरोप मानेंकडून करण्यात आला होता.
आम्ही आजही आमच्या कामाच्या ठिकाणी जात असून माने यांनी आमच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. विरोध केल्यास पगार थकवले जायचे. याकामी त्यांना मनीषा गुरव यांनी मदत करत असल्याचा आरोप या महिलांनी आज माध्यमांसमोर केला.
दरम्यान भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा कांताताई नलावडे यांनी मानेंवर कठोर कारवाई करत त्यांची पद्मश्री पदवी काढून घेण्याची मागणी केली आहे. तसेच या संस्थेतील सर्वच महिलांकडे गोपनीयपणे चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.