विदर्भात गेल्या पाच सहा दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून उन्हाचे चटके जाणवायला लागले. विदर्भात सर्वात अधिक तापमान वर्धाला ४१.२ अंश से. तर ब्रम्हपुरी ४१.१ अंश से. नोंदविलल्या गेले.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते फिरत असून त्यामुळे दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत आहे. विदर्भात उन्ह जाणवायला लागले असून लोक दुपारी १ नंतर सहजासहजी घराबाहेर पडण्याची हिंमत करीत नाही. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदवले गेले असून गेल्या चार पाच दिवसापासून पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे.
दोन दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी आणि वर्धा ४२ अंश से. पर्यंत पोहोचले होते. तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे उष्णतामानात वाढ होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आणि शहरातील काही भागात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक या भारनियममनामुळे त्रस्त झाले आहे. प्रखर उन्हाळामुळे चाकरमानी लोक सोडले तर अनेक लोक सकाळी अकरानंतर घराबाहेर न पडता घरीच राहणे पसंत सायंकाळी ५.३० नंतर घराबाहेर पडतात. रणरणत्या उन्हामुळे शहरातील सिव्हील लाईन भागातील रस्ते दुपारच्यावेळी सानसुन दिसतात. एकीकडे प्रखर उन्हाळा असताना अजूनही ग्रामीण आणि शहरातील काही भागात वीज जाण्याचे प्रकार सुरू आहे त्यामुळे अनेक लोकांना असह्य़ उकाडाचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील शीतपेयाच्या गाडय़ाभोवती लोकांची गर्दी दिसून येत आहे. विदर्भात चंद्रपूर ३०.८ अंश से., ब्रह्मपुरी ४१.३, वर्धा ४१.२, नागपूर ४०.२, अकोला ४०.७, अमरावती ३९.८, बुलढाणा ३७, गोंदिया ३९.३, वाशीम ३८.६,  यवतमाळ ३९.२ अंश सें. तापमान नोंदवले गेले आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयात कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आले आहे.