गेल्या आठवडय़ापर्यंत डोळ्याला पाणी आणणारा कांदा आणि वाढलेल्या भाज्यांच्या किमती या आठवडय़ात कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवनवीन भाज्यांची भर पडू लागल्याने आठवडी बाजार पुन्हा बहरण्यास सुरुवात झाली आहे.
बाजारात २० रुपये पावाने  मिळणारी मेथी आणि कोथिंबीर १५ रुपयात अर्धा किलो मिळत आहे. श्रावणी घेवडा तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात ३० रुपये पाव होता. कदाचित सर्वात जास्त किमतीला विकली जाणारी हीच फळभाजी असावी. आता घेवडा १५ रुपये पावावर आला आहे. पालक भाजीही मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध असून पाच रुपये पावाने ती मिळत आहे. वालाच्या शेंगा, चवळीच्या गडद हिरव्या, पोपटी आणि जांभळ्या रंगाच्या शेंगांमध्ये दोन-तीन रुपयांच्या फरक दिसतो. अद्याप या शेंगा १५ रुपये पावच्या खाली उतरलेल्या नाहीत. भेंडी, कारले, सिमला मिरची, फूल कोबी १५ रुपये पाव झाले आहे.
गेल्यावर्षी स्वस्त मिळणारे वांगे पावसाळ्यात वधारले होते. आता थंडी पडू लागल्याने भाज्यांचे भावही खाली आले आहेत. शेतकरी गुरांना टाकतात ती वांगी अंडय़ाच्या भावाने मिळत असल्याचा अनुभव यावर्षी ग्राहकांनी घेतला. कोहळ्याने वर्षभर किमतीत सातत्य राखले.  २० रुपये किलोच्या बटाटय़ाने गेल्या चार महिन्यांपासून ग्राहकांना तारले. वांगे बटाटे, फ्लावर बटाटे,  शेंगा बटाटे किंवा मेथी बटाटे असे कोणत्याही भाजीत सहज सामावून जाणारे बटाटे बाकी भाज्यांपेक्षा स्वस्तच म्हणायला हवेत. कांद्याने साठी- सत्तरी गाठली होती. गेल्या आठवडी बाजारात ते पन्नाशीवर आले. एक किलो कांदा घेणारे अध्र्या किलो घेणेच पसंत करीत होते. गृहिणी सकाळ आणि सायंकाळच्या स्वयंपाकात एकच कांदा अर्धाअर्धा करून पुरवत होत्या.
नवीन वालाच्या शेंगा चवदार असल्याने अद्याप २० रुपये पावच्या खाली उतरलेल्या नाहीत. टोमॅटोने अद्याप ४०-५० रुपये किलोचा भाव सोडलेला नाही. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने आठवडी बाजारात कच्चे, बारीक हिरवे टोमॅटोही शेतकरी विकण्यासाठी आणत आहेत. हा अपवाद वगळता मार्च ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत २० ते ३० रुपये पावाने विकणाऱ्या फळभाज्या आता १५ रुपयात अर्धा किलो मिळत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारात भाज्यांची आवकही चांगलीच वाढली असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील आठवडी बाजार आता भाज्यांनी बहरले आहेत.