पाणीपट्टीत तिपटीने वाढ

लातूरच्या पाणीपट्टीत तिप्पट वाढ करून दिवाळीपूर्वीच लातूरकरांचे दिवाळे काढण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठरवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लातूरच्या पाणीपट्टीत तिप्पट वाढ करून दिवाळीपूर्वीच लातूरकरांचे दिवाळे काढण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठरवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिन्यातून केवळ चार दिवस शहरात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या ९ महिन्यांपासून याच पद्धतीने पाणी पुरवले जात असून आगामी ९ महिने यात कोणताही फरक पडण्याची चिन्हे नाहीत. उलट पाणी कपातीत वाढच होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, तरीही आता दि. १ ऑक्टोबरपासून पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने घेतला आहे. घरगुती नळधारकांना दरमहा १५० रुपये पाणीपट्टी आकारण्यात येत होती. नव्या निर्णयानुसार दरमहा ४२१ रुपये आकारले जाणार आहेत. वर्षांकाठी १ हजार ८०० रुपयांऐवजी ५ हजार रुपये प्रत्येकाला पाणीपट्टीपोटी भरावे लागणार आहेत. शाळा, महाविद्यालये, सरकारी व निमसरकारी कार्यालयांना दरमहा ६४६ रुपये, तर व्यावसायिकांना १ हजार ६२१ रुपये मोजावे लागतील. ग्राहकांनी मीटर बसवून घेतल्यास जितके पाणी वापरले तितकेच बिल आकारले जाणार आहे. मीटर बसविण्याची ग्राहकांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही. पाणीपट्टीत तिप्पट वाढ केल्यामुळे ग्राहकांनाच आता मीटर बसवणे फायद्याचे ठरणार आहे. १५ हजार लिटपर्यंत घरगुती नळधारकांना प्रतिहजार १४ रुपये ३० पसे पाणीपट्टी आकारली जाणार आहे. पाण्याची तीव्र टंचाई असताना अजूनही ५० टक्के पाणी वाया जात आहे. पाणीपट्टीत वाढीनंतर लोक पाण्याचा योग्य वापर करतील, अशी जीवन प्राधिकरणची धारणा असावी. सध्या तरी वाढलेल्या पाणीपट्टीमुळे लातूरकर चांगलेच संतप्त झाले आहेत.
पाणीपट्टीत वाढ रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
महापालिका पदाधिकारी व नागरिकांना विश्वासात न घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणीपट्टीत केलेली वाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस पक्षानेही केली आहे. महापालिकेच्या नियमानुसार कोणतेही दर दुपटीपेक्षा जास्त वाढवता येत नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कोणालाही विश्वासात न घेता लातूरकरांच्या पाणीपट्टीत तिपटीने वाढ केली. ही वाढ लातूरकरांवर अन्याय करणारी आहे. या वाढीचा निषेध करण्यात आला असून तातडीने ही वाढ रद्द करावी, अशी मागणी महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, स्थायी समितीचे सभापती राम कोंबडे, पाणीपुरवठा सभापती नरेंद्र अग्रवाल, पक्षाचे गटनेते विक्रमसिंह चौहान, शहराध्यक्ष अॅड. समद पटेल यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increase to triple water tax in latur

ताज्या बातम्या