गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात दारूच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून सुमारे ४० हजार कोटी रुपयांची दारू या राज्यात विकली जाते. हे आकडे पाहिले तर महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होते आहे का, असा थेट सवाल ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी रविवारी ठाण्यात उपस्थित केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने येथील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
भारतीय महिलांच्या वैधव्याची परीक्षा घेणारे रसायन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दारूला गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात प्रतिष्ठा मिळत असल्यासारखे चित्र आहे. या राज्यात एका वर्षांत सुमारे ४० हजार कोटी रुपयांची दारूची विक्री होते हे मुळातच धक्कादायक आहे. त्यामुळे या प्रश्नाची व्याप्ती गंभीर स्वरूपाची आहे, असे मत या वेळी डॉ. बंग यांनी व्यक्त केले. बालमृत्यूची समस्याही या राज्यात दारूइतकीच गंभीर आहे. विज्ञानाची मदत घेऊन लोकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास ही समस्या मुळापासून उपटून काढता येईल, असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला. विज्ञानाची मदत घेऊन बालमृत्यूचा दर कमी झाल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.
कोणताही सिने कलाकार नसतानाही कार्यक्रमांना गर्दी होऊ शकते हे फक्त ठाण्यातच पाहायला मिळते. आदिवासी लोकांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा शेती आणि जंगालापासून होत असतो. शेतीची कामे करताना खास करून पाठीचा कणा व हाताच्या दुखण्यांनी आदिवासी बेजार होत असत. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या या लोकांना डॉक्टर ही संकल्पना पचनी पडत नव्हती. त्यामुळे काही आदिवासींचे गट तयार करून त्यांच्या समस्या त्यांना समजतील, अशा पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच ‘सर्च’ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने गावागावात जाऊन तेथील आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या. त्यातून पुढे आदिवासींना उपयोगी पडेल, अशा रुग्णालयाची उभारणी झाल्याची आठवणही या वेळी डॉ. बंग यांनी सांगितली. रुग्णालयातील विभागांची भीती वाटते म्हणून आदिवासींसाठी झोपडय़ांचे दवाखाने उभारले गेली. या दवाखान्यांमध्ये आदिवासींची दैवत असणारी दत्तेश्वरी देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. अशा प्रयोगातून आदिवासींना विज्ञानाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे ते म्हणाले.