भारताला यापुढे ज्ञानशक्तीची मोठी लढाई करावी लागणार आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षण, राजेशाही, नोकरशाही आणि समाज यांचा संगम घडवून आणला आहे. त्यांनीही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. पुरस्काराच्या रूपाने त्यांना ज्ञानाची तलवार मिळाली आहे. त्याचा वापर त्यांनी ज्ञानसत्ता वाढवण्यासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना, ज्ञानाला ज्या वेळी शौर्याचा पदर लागून त्रिशक्तीचे वरदान लाभेल त्यावेळीच भारत हा जगातील कणखर लोकशाहीचा देश बनेल, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर यांनी केले.  
विजय समारोह समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कारा’ ने भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांना, तर निर्मला कनन, मेजर जनरल एस. के. यादव यांना कराड पालिकेतर्फे मानपत्र देऊन डॉ. निगवेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले; त्या वेळी ते बोलत होते. विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव कणसे-पाटील, लेफ्टनंट जनरल एन. एस. चिमा, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, शंकराप्पा संसुद्दी यांची या वेळी उपस्थिती होती.  
डॉ. अरूण निगवेकर म्हणाले की, भारताने बांगलादेशवर विजय मिळवून पाच दशके जाऊनही आज त्याची आठवण आल्यावर अंगावर काटा उभा राहतो. त्याची आठवण राहावी म्हणून कर्नल संभाजीराव पाटील यांनी येथे विजय दिवस समारोह सुरू केला आहे. त्या माध्यमातून त्यांनी शौर्य, महिला आणि ज्ञान या त्रिशक्तींना एकत्र करून समाजातील प्रत्येकाला त्यांचे महत्त्व समजावून देण्याचे काम केले आहे. यशवंतराव चव्हाण यांचा समाजकारण हा कणा असून, त्यांनी गरजेऐवढेच राजकारण करून समाजकारण केले. त्यामुळे सामान्य माणूस उभा राहिला.
डॉ. कदम यांनी सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मला ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ मिळाला, हा माझ्या आयुष्यात भाग्याचा क्षण आहे.
निर्मला कानन म्हणाल्या की,  माझे वडील सैन्यदलात होते. मी, माझे पती आणि मुलगा सध्या सैन्यदलात कार्यरत आहोत. सैन्यदलात महिलांनाही नोकरीची चांगली संधी आहे. त्यासाठी पालकांनी धाडस करून आपल्या मुलींना सैन्यदलात पाठवावे. तेथे चांगले करिअर करण्याची संधी आहे. मेजर जनरल एस. के. यादव यांनीही सत्कारास उत्तर दिले. प्रास्ताविकात संभाजीराव पाटील यांनी मानपत्र देण्यामागची आणि विजय दिवस आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.