आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडसाठी भारतीय चमूची नुकतीच निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षीच्या ऑलिम्पियाडचे आयोजन पुण्यामध्ये बालेवाडी येथे ३ ते १२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. ज्या देशामध्ये हे ऑलिम्पियाड होते, त्या देशाच्या दोन संघांना सहभागी होण्याचा मान मिळतो. त्यामुळे या ऑलिम्पियाडसाठी यंदा ६ ऐवजी १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबईच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता झालेल्या शिबिराअंती एका विशेष समारंभात भारतीय चमू आणि त्यांच्याबरोबर जाणारे मार्गदर्शक शिक्षक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या संचालक प्रा. जयश्री रामदास होत्या. ‘केवळ वाचून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून विज्ञान शिकणे महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. ऑलिम्पियाडचे राष्ट्रीय समन्वयक प्रा. विजय सिंग म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी ऑलिम्पियाडचा हा आंतरराष्ट्रीय उपक्रम म्हणजे नव्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा एक उत्सव आहे, असे मत व्यक्त केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्यापूर्वी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी प्रा. विजय सिंग यांनी दिली.