सौदी अरेबिया हे भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे पुन्हा एकदा पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींकडे केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. गेल्या काही वर्षांत इंडियन मुजाहिदिन, लष्कर-ए-तोयबा आणि हुजी या दहशतवादी संघटना सौदी अरेबिया येथे एकत्र येऊन पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारतात दहशतवादी कारवाया करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा प्रश्न गंभीरपणे घेतला आहे.
पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोज सय्यद, इम्रान वाजीद खान आणि असद खान यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात, त्यांनी सौदी अरेबियातील लष्कर-ए-तोयबाचा भारतातील म्होरक्या असलेला व येथील अनेक दहशतवादी कारवायातील सामील असलेला फय्याज कागझी याची दोन ते तीन वेळा भेट घेतल्याचे आणि दहशतवादी कारवाया करण्याबाबत चर्चा केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे स्फोटाचा मुख्य आरोपी असद खान हा ऑगस्ट २००९ कागझीच्या संपर्कात आला. त्या वेळी कागझी हा सौदी अरेबियात होता. तो सौदीमधून इमेल व दूरध्वनीवरून भारतातील साथीदारांच्या संपर्कात होता. त्यानंतर संपर्क वाढल्यामुळे असद हा हज यात्रेच्या निमित्ताने सौदीला जाऊन फय्याज कागझीशी भेट घेऊन भारतातील दहशतवादी कारवायांबाबत चर्चा करत असत. ओळख जास्त वाढल्यानंतर भारतातील अनेक दहशतवादी कारवायातील आरोपी रियाझ भटकळ व इक्बाल भटकळ यांच्याशी कागझीने असद व इतर आरोपींशी ओळख करून दिली. त्यांच्या सागण्यावरूनच कतिल सिद्दीकीच्या खुनाचा बदला म्हणून पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याच्या सूचना देण्यात आल्या होता, अशी माहितीही दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी झबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल याला जून २०१२ मध्ये सौदी अरेबियातूनच ‘डिपोर्ट’ करून आणण्यात आले. त्याच्या चौकशीत लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंधतील दहशतवादी सौदी अरेबियात कार्यरत असल्याचे उजेडात आले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरूनच नांदेड, आंध्र प्रदेश व कर्नाटक या ठिकाणाहून अठरा तरुणांना अटक केली होती. हे सर्व जण भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांना सौदी अरेबियातील लष्कर-ए-तोयबा व हुजी या दहशतवादी संघटनांशी संबंधित व्यक्तींकडून सूचना येत होत्या. नांदेड ‘मोडय़ुल’ चा प्रमुख महंमद अक्रम याला पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी बेंगलोरमध्ये अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने सौदी अरेबिया येथे एक वर्षे दहशतवादी कारवायाचे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षण घेऊन तो मराठवाडय़ातील काही तरुणांना दहशतवादी कारवायांकडे वळविले उघड झाले होते.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग याला कागझी व अबु जिंदाल यांनी २००८ मध्ये कोलंबो येथे दहशतवादी कारवायाचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर २००९ मध्ये पुणे स्फोटातील आरोपी असद खान, इम्रान व फिरोज सय्याद हे कागझीच्या संपर्कात आले. यांनीही हज यात्रेच्या निमित्ताने सौदी अरेबियाला जाऊन कागझीशी संपर्क वाढविला. येथील कार्यरत असेलेल्या दहशतवाद्यांनी २००९ नंतर पाकिस्तानच्या मदतीने सौदी अरेबिया हे भारतात दहशतवादी कारवाया केंद्र बनविले आहे.
भारतातील दहशतवादी कारवायासाठी हवाला रॅकेटमार्फत पैसा पुरविला जात असल्याचे पुणे स्फोटातील आरोपी पकडल्यानंतर पुन्हा उघड झाले. सौदी अरेबिया हे एक हवाला रॅकेटचे एक महत्त्वाचे केंद्र असल्याने भारतातील दहशतवादी कारवायांसाठी त्या ठिकाणाहून हवालामार्फत पैसा येत असल्याचे पोलिसांच्या तपास उघड झाले आहे.
सौदी अरेबिया बनले भारतीय दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र!
सौदी अरेबिया हे भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे पुन्हा एकदा पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींकडे केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
First published on: 16-10-2012 at 06:17 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian terrorist new centre at soudi arbia