ठाणे येथील इंदिरानगर भागातील नाल्याशेजारील वस्तीतील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून नाल्यातूनच प्रवास करावा लागतो आहे. या वस्तीमध्ये ये-जा करण्यासाठी नाल्याच्या शेजारी रस्ता होता. मात्र पावसाळ्यामध्ये नाल्याची भिंत कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नाल्यातूनच ये-जा करावी लागत असून यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासन तसेच स्थानिक नगरसेवकाकडे तक्रारी केल्या. मात्र अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही.  
ठाणे येथील इंदिरानगर भागात एका मोठय़ा नाल्याशेजारी सात ते आठ घरांची वस्ती असून जवळच असलेल्या मामा-भाचे डोंगरातील पाणी या नाल्यातून वाहते. या नाल्याशेजारीच सुमारे दोन ते तीन फुटांचा रस्ता असून तेथूनच या वस्तीत ये-जा करण्याचा मार्ग होता. तसेच मामा-भाचे डोंगरावर जाण्यासाठीही या रस्त्याचा नागरिक मोठय़ा प्रमाणात वापर करतात. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यामध्ये नाल्याची भिंत खचल्याने येथील रस्ता खराब झाला. तसेच या रस्त्यावर असलेल्या पायऱ्यांची दुरवस्था झाली. त्यामुळे नागरिकांना येथून ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. तसेच पायऱ्यांवरून पाय घसरल्यास नाल्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांनीच पायऱ्यांच्या जागेवर डेब्रीजने भरलेल्या गोण्या टाकून तात्पुरता मार्ग तयार केला. त्यामुळे वस्तीत ये-जा करण्यासाठी त्यांना काहीसा आधार झाला होता. मात्र यंदाच्या पावसाळ्यामध्ये नाल्याची खचलेली भिंत पूर्णत: कोसळून खाली पडल्याने येथील रस्ताच बंद झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून येथील रहिवाशांना नाला ओलांडून बाहेर यावे लागते. मात्र नाल्यावर पूल नसल्याने त्यांना नाल्यात उतरूनच बाहेर यावे लागते आहे. सध्या नाल्यात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने तो ओलांडणे शक्य होत आहे. मात्र अशीच स्थिती राहिल्यास येत्या पावसाळ्यात त्यांचे अतोनात हाल होऊ शकतात. या संदर्भात येथील रहिवाशांनी महापालिका प्रशासन तसेच स्थानिक नगरसेवकाकडे तक्रारी केल्या. मात्र या दोघांनी अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले.