जमिनीचा  ताबा देण्या-घेण्याच्या कारणावरून वेळापूर (ता.माळशिरस) येथे झालेल्या जळीत प्रकरणातील फिर्यादी अशोक विठ्ठल पवार याचे आज (मंगळवारी) सकाळी पुण्यातील एका रुग्णालयात निधन झाले. राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून नाव असून, पवार यांच्या निधनाने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळू पाहात आहे.
वेळापूर येथील धनंजय कुलकर्णी यांच्या मालकीच्या १६ एकर जमिनीपैकी १५ एकर जमीन सचिन घोडके व एक एकर विजय बोडरे यांनी खरेदी घेतली. तशा त्यांच्या नोंदीही झाल्या आहेत. मात्र या जमिनीत गेल्या ४० वर्षांपासून आपली वहिवाट असल्याचा दावा करीत विठ्ठल पवार यांनी या जमिनीतील कब्जा सोडण्यास नकार दिला. २४ ऑगस्ट रोजी या जमिनीत कब्जा घालण्यासाठी खरेदीदार गेले असता तेथे हा प्रकार घडला. या जळीतात फिर्यादी अशोक पवार, त्याचे वडील विठ्ठल व आई पारूबाई हे भाजले होते.
उपचार सुरू असतानाच घेतलेल्या पुरवणी जबाबात धवलसिंह मोहिते पाटील यांनी यांच्या चिथावणीनेच हा प्रकार घडल्याचा आरोप पवार यांनी केला होता. त्यानुसार धवलसिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र माळशिरस येथील अपर सत्र न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन देऊन त्याची सुनावणी उद्या  (४ सप्टेंबर) ठेवली असताना आज सकाळी सहाच्या सुमारास अशोक पवार यांचे निधन झाले. त्यांचे बंधू दत्तात्रय पवार यांनी या प्रकरणी आरोपी म्हणून सहा.पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनाही या प्रकरणी आरोपी म्हणून समाविष्ट करावे, तसेच आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र सोलापूरचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शवचिकित्सा करून सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह वेळापुरात आणण्यात आला. तेथे सकाळपासूनच तणावाची परिस्थिती असली तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात ठेवला होता.
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी जाळून मारीन, अशी धमकी दिल्याची तक्रार विठ्ठल पवार यांनी केली होती. त्याच्या प्रती उत्तमराव जानकर यांनी वेळापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाटण्यात आल्या.